लावालावी करणाऱ्याला जाब विचारल्याने केली लाकडी राफ्टरने मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
लावालावी करून नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरविणाऱ्या व्यक्तीला जाब विचारायला गेलेल्या युवकालाच लाकडी राफ्टरने मारहाण करण्यात आल्याची घटना १७ जानेवारीला शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. लाकडी राफ्टर युवकाच्या डोक्यावर मारण्यात आल्याने त्याचे डोके फुटून डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे युवकाने मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. युवकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील नायगाव येथे वास्तव्यास असलेल्या सुनिल बापूराव जांभुळकर (४६) या युवकाचे आई वडील चारगाव येथे राहतात. चारगाव येथे त्यांची शेती आहे. मागील वर्षी युवकाचे आई वडील वाहन भाड्याने करून बाहेरगावी गेले होते. त्याच गावी सुनिल जांभुळकर या युवकाचे सोयरेही राहतात. वाहन चालक असलेल्या प्रकाश काळे याने त्यांच्या सोयऱ्यांकडे सुनिल बद्दल लावालावी केली. सुनिल हा आई वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्यांची काळजी घेत नाही, असे प्रकाश काळे या वाहन चालकाने सुनिलच्या सोयऱ्याजवळ सांगितले. प्रकाश काळे याने त्याच्याबद्दल नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण केल्याची माहिती नंतर सुनिलच्या कानावर आली. त्यामुळे सुनिलने प्रकाश काळे याला त्यावेळी फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन लागत नव्हता. त्यानंतर १७ जानेवारीला सुनिलने प्रकाशला फोन लावला असता त्याला फोन लागला. तेंव्हा सुनिलने त्याला फोनवर तू माझी नातेवाईकांमध्ये बदनामी का करतो, असा जाब विचारला असता प्रकाश काळे याने सुनिलला मारण्याची धमकी देत त्याला शेलू येथे एका घरी बोलाविले. सुनिल हा नायगाव वरून शेलू येथे आल्यानंतर प्रकाश काळे याने त्याला चारगाव येथील बियरबार जवळ येण्यास सांगितले.
सुनिल हा सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास चारगाव येथील बियरबार जवळ पोहचल्यानंतर प्रकाश काळे हा तेथे हजर होता. सुनिलने तू माझ्या सोयऱ्याला मी आई वडिलांचा सांभाळ करीत नाही, असे सांगून माझी नातेवाईकांमध्ये बदनामी का करीत आहे, असा जाब विचारला असता प्रकाश काळे याने सरळ लाकडी राफ्टरने सुनिलला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रकाश काळे याने सुनिलच्या डोक्यावर, डाव्या हातावर व पाठीवर लाकडी राफ्टरने जबर मारहाण केली. यात सुनिलचे डोके फुटले व हातावर सुजण आली. डोक्यातून रक्त वाहू लागल्याने सुनिल जांभुळकर याने सरळ पोलिस स्टेशनला येऊन वाहन चालक प्रकाश काळे याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. सुनिलच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी प्रकाश काळे रा.बोरगाव ता. वणी याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment