वन विभागाला तब्बल दहा दिवसानंतर गवसले होते आरोपी, दोघांना मिळाला लगेच जामीन, काही आरोपी अजूनही वन विभागाच्या रडारवर
प्रशांत चंदनखेडे वणी
पांढरकवडा वन विभागांतर्गत वणी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रात ७ जानेवारीला एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर पांढरकवडा, वणी व मारेगाव वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वाघ करंट लागून मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. मात्र वाघाची नखे व दात गायब असल्याचे वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी वाघाची नखे व दात लंपास करणाऱ्या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेणे सुरु केले. वाघाच्या मृत्यू प्रकरणाचा विविध अँगलने तपास करणाऱ्या वन विभागाच्या टीमला तब्बल दहा दिवसानंतर आरोपींचा सुगावा लागला. आरोपी हे वेकोलि कर्मचारी असल्याचे वन पथकाच्या तपासातून निष्पन्न झाल्याने वणी व उकनी येथून चार आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. मात्र या चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन आरोपींचा लगेच जामीन मंजूर केला. तर दोन आरोपींना वन कोठडी सुनावली. वन कोठडी सुनावलेल्या एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्याला तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मात्र वन विभागातच आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने वन अधिकाऱ्यांचा बेजाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. आरोपींजवळून वाघाची एकूण किती नखं व दात जप्त करण्यात आले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उकनी कोळसाखाण परिसरातील आर.सी.कार्यालयाजवळील एका विद्युत डीपी जवळ एक पट्टेदार वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. वाघाचा मृत्यू होऊन १२ ते १३ दिवस लोटले होते. त्यामुळे त्याठिकाणी वाघाचा केवळ सापळा शिल्लक राहिला होता. उकनी कोळसाखाणीतीलच कर्मचाऱ्यांना मृत वाघ आढळून आल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर ही माहिती वेकोलि अधिकाऱ्यांना देण्यात आली. वेकोलि अधिकाऱ्यांनी याबाबत वन विभागाला कळविले. वन विभागाचे अधिकारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वाघ जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र वाघाची नखे व दात गायब असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी वाघाच्या शरीराचे नमुने घेतल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे वाघाचा अंत्यविधी केला. वाघाच्या शरीराचे नमुने लॅबमध्ये तपासणी करीता पाठविले. तसेच वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
वाघाच्या मृत्यूचा विविध अँगलने तपास करीत असतांनाच वन अधिकाऱ्यांना सूत्रधारांकडून आरोपींबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या टीमने वेकोलि कर्मचाऱ्यांकडे तपासाची दिशा वळविली. वेकोलि कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर चार आरोपींची नावे समोर आली. वन विभागाच्या पथकाने उकनी व वणी येथून चारही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. सतिश अशोक मांढरे (२९), आकाश नागेश धानोरकर (२७) दोघेही रा. वणी, नागेश विठ्ठल हिरादेवे (२७), रोशन सुभाष देरकर (२८) दोघेही रा. उकनी या चारही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सतिश मांढरे व आकाश धानोरकर यांचा लगेच जामीन मंजूर केला. तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर यांना वन कोठडी सुनावली. यातील नागेश हिरादेवे या आरोपीने वन कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या सर्व आरोपींजवळून वन विभागाने किती नखं व दात जप्त केले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. वाघाचे अवयव अद्यापही गायब असून वन अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन कोठडी सुनावलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी किती आरोपींची नावे समोर येतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मृत वाघाची नखे व दात गायब करण्यामागे आरोपींचा नेमका काय उद्देश होता, हे ही अजून समोर आले नाही. परंतु एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आरोपी प्रचंड धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वन विभागाच्या हाती आणखी किती आरोपी लागतात, त्यांना शिक्षा होते की जामीन मिळतो, याकडे आता शहरवासियांचं लक्ष लागलं आहे.
Comments
Post a Comment