आस्वाद हॉटेल मालकाच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील आस्वाद हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालून वेटरला शिवीगाळ करतांनाच हॉटेल मालकाच्या पत्नीला मारहाण करणाऱ्या सहा जणांवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ जानेवारीला रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडली. हॉटेल मालकाच्या पत्नीला मानेवर ताकदीने थापड मारल्याने ती जमीनीवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आस्वाद हॉटेलमध्ये रात्री काही जण जेवण करायला गेले. हॉटेलमध्ये काही वेळ बसल्यानंतर ते बाहेर गेले व आणखी परत आले. त्यांनी मद्य प्राशन केल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. जेवणाचा ऑर्डर दिल्यानंतर त्यांना सेवा पुरविणाऱ्या वेटरला ते वारंवार आवाज देऊन त्रास देत होते. जेंव्हा वेटर त्यांच्या जवळ गेला तेंव्हा त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वेटरला शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना जेंव्हा हॉटेलमध्ये उपस्थित असलेली हॉटेल मालकाची पत्नी समजवायला गेली तेंव्हा त्यांनी तिलाच दमदाटी करून तिच्या मानेवर ताकदीने थापड मारली. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. हॉटेलमध्ये बेकायदेशीर मंडळी जमवून हुडदंग घालतानाच पत्नीला मारहाण केल्याने आस्वाद हॉटेलचे मालक प्रकाश परमजितसिंग बग्गा यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सहा जणांवर बीएनएसच्या कलम १८९, १९०, ११५(२), ३५२, ३५१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
Comments
Post a Comment