ऑटोतुन पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
ऑटोतून पडून मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील सोनामाता मंदिराजवळ घडली. रंजना प्रवेश जंगमवार वय अंदाजे ४५ वर्षे रा. राजूर (कॉ.) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
लालपुलिया परिसरातील कोलडेपोमध्ये मजूर म्हणून काम करणारी ही महिला सायंकाळी लालपुलिया येथून ऑटोने राजूर या आपल्या गावी जात असतांना सोनामाता मंदिराजवळ ती ऑटोतून खाली पडली. यात तिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ऑटोत क्षमतेपेक्षा जात प्रवासी भरून भरधाव व निष्काळजीपणे ऑटो चालविले जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ऑटो चालक रहेमत रहीम खान हा प्रवासी घेऊन राजूरला जात असतांना हा अपघात घडला. ऑटोने प्रवासी वाहतूक करतांना प्रवासी व्यवस्थित बसले किंवा नाही, याची खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडला. ऑटो चालकाने करकचून ब्रेक मारले आणि महिला ऑटोतून खाली पडली. मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर लेकरांचा सांभाळ व त्यांचे पालनपोषण करणारी ही महिला ऑटो चालकाच्या बेजबाबदारपणाचा बळी ठरली. तिच्या जाण्याने मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं आहे. लेकरं पोरकी झाली आहेत. मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंजना जंगमवार या महिलेच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. महिला ऑटोतून खाली पडल्यानंतर तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी ऑटो चालक रहेमत रहीम खान (४८) रा. राजूर (कॉ.) याला अटक केली. त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment