वर्दळीचे ठिकाण असलेल्या तहसील कार्यालय परिसरातून दुचाकी लंपास
प्रशांत चंदनखेडे वणी
नागरिकांच्या गर्दीने नेहमी गजबजून राहणाऱ्या तहसील कार्यालय परिसरातून तेथेच संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना २७ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याने दुचाकीचा तहसील कार्यालय परिसर व इतरत्र शोध घेतल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शहरातील तैलीफैल येथे वास्तव्यास असलेला धनंजय अशोक देशपांडे (२४) हा तरुण तहसील कार्यालय येथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. २७ जानेवारीला सकाळी १० वाजता नेहमी प्रमाणे दुचाकी तहसील कार्यालयासमोर उभी करून तो रेकॉर्ड रूममध्ये कर्तव्यावर गेला. सायंकाळी जेंव्हा कामाच्या तासिका पूर्ण करून तो घरी जाण्यास निघाला असता त्याला तहसील कार्यालयासमोर उभी केलेली मोटारसायकल आढळून आली नाही. त्यामुळे त्याला धक्काच बसला. त्याने दुचाकीचा तहसील कार्यालय परिसर व शक्य असलेल्या सर्वच ठिकाणी शोध घेतला. मात्र त्याला मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. शेवटी मोटारसायकल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सायंकाळी ५.३० वाजता मोटारसायकल (MH २९ AZ १३४९) चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. धनंजय देशपांडे याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तहसील कार्यालय परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला इतरही महत्वाची कार्यालये असल्याने नागरिकांचे सतत येथे जाणे येणे सुरु असते. अशा या वर्दळीच्या परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास केल्याने नागरिक काळजीत आले आहेत. तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेऊन चोरट्याने दुचाकी चोरीचा डाव साधला. शहरात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. घर, कार्यालय व दुकानांसमोर नागरिकांनी उभ्या केलेल्या दुचाक्या चोरटे लंपास करू लागले आहेत. शहरासह तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक कमालीचे काळजीत आले आहेत. दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment