मारेगाव नगरपंचायतीने काढला अजब फतवा, आणि वंचितने छेडले बेमुद्दत आंदोलन

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारत सरकारच्या जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियमाला मूठमाती देत मारेगाव नगरपंचायतीच्या बेजाबदार अधिकाऱ्यांकडून अजब फतवा काढण्यात आला आहे. जन्म मृत्यूशी संबंधित शासनाच्या धोरणाला हडताळ फासून मारेगाव नगरपंचायत नागरिकांची लूट करीत आहे. नगरपंचायतीने जन्म मृत्यू कागद्पत्रांसंदर्भात नागरिकांच्या लुटीचा फतवा काढल्याने या अन्यायाविरोधात मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचं रणशिंग फुंकलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी पासून वंचितच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर "जवाब दो", हे बेमुद्दत घंटानांद आंदोलन सुरु केलं आहे. 

जन्म व मृत्यू यांच्या नोंदणीचे विनियमन करण्याबाबत व त्यांच्याशी निगडित असलेल्या संबंधित बाबींची तरतूद करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या जन्म व मृत्यू अधिनियमाला तिलांजली देण्याचं काम मारेगाव नगरपंचायतीने केलं आहे. जन्म व मृत्यू अधिनियम १९६९ च्या भारत सरकारच्या अधिनियमाचे उल्लंघन करीत मारेगाव नगरपंचायतीने जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भात अजब फतवा काढला आहे. मारेगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची अक्षरशः आर्थिक लूट करणारा हा फतवा आहे. नगरपंचायतीने नागरिकांच्या लुटीचे धोरण अवलंबिल्याने तालुका वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. 

मारेगाव नगरपंचायतीने जन्म मृत्यू नोंदणी करिता लागणारी कागदपत्रे याबाबत कुठलेही विवरण प्रसिद्धी फलकावर लावले नाही. तथापि जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळे कागदपत्र आणण्याची सरबत्ती लावून त्यांना वेठीस आणण्याचे काम सुरु केले. मनमर्जी उत्तरे देऊन नागरिकांना त्रास देण्याच्या प्रयत्नातून त्यांची आर्थिक लूट करण्याचा सपाटाच नगरपंचायतीने सुरु केला आहे. शासनाच्या जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार नियम आणि अटींना अधिनस्त राहूनच जन्म मृत्यूची नोंद करणे बंधनकारक असतांना नगरपंचायतीने नागरिकांची अलिखित पद्धतीने आर्थिक लूट सुरु केली आहे. 

गजानन चंदनखेडे यांच्या आजीच्या मृत्यूची नोंद करतेवेळी नगरपंचायतीच्या या आर्थिक लुटीचा पर्दाफाश झाला. गजानन चंदनखेडे यांच्या आजीचे निधन झाल्यानंतर त्यांनी नगरपंचातीकडे आजीच्या मृत्यूची नोंद करण्याकरिता रीतसर अर्ज केला. मात्र नगरपंचायतीने त्यांचा तो अर्ज फेटाळून लावत १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र लिहून आणण्यास सांगितले. स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र लिहून आणल्यानंतरच मृत्यूची नोंद होईल असे त्यांना बजावण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून आणले. आणि तेंव्हा कुठे त्यांच्या आजीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकारानंतर नगरपंचायती कडून होणारी आर्थिक लूट समोर आली. जन्म व मृत्यूच्या नोंदणी करीता नागरिकांवर १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरचा भुर्दंड लादून नगरपंचायत त्यांची आर्थिक लूट करू लागली आहे. जेंव्हा की शासनाच्या नियमाप्रमाणे विहित मुद्दतीत तोंडी किंवा साधा अर्ज करूनही मृत्यूची नोंद करता येते. मात्र मारेगाव नगरपंचायतीने अजब फतवा काढून नागरिकांची सर्रास लूट सुरु केली आहे. हा प्रकार वंचित बहुजन आघाडी मारेगाव तालुका शाखेच्या निदर्शनास येताच त्यांनी नगरपंचायतीच्या या लुटारू धोरणाविरोधात बंड पुकारून "जवाब दो" हे बेमुद्दत घंटानांद आंदोलन सुरु केले आहे. 

मारेगाव न.प. च्या नगराध्यक्षांनी दिली आंदोलनस्थळाला भेट 

प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी नगरपंचायत मारेगाव कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू केलेल्या "जवाब दो" आंदोलनाची दखल घेत न. प. मारेगाव चे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की यांनी आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली, व आंदोलकांना त्वरित न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.

वंचित बहुजन आघाडी मारेगाव तालुक्याच्या वतीने छेडण्यात आलेले हे आंदोलन तालुकाध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या मार्गदर्शनात व वंचितचे राजेंद्र निमसटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. राजेंद्र निमसटकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या घंटानांद आंदोलनाला सुरवात झाली. या आंदोलनात आंदोलक गजानन चंदनखेडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष नूतन तेलंग, जिल्हा सचिव प्रणिता ठमके, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, स्मिता खैरे, अश्विनी खाडे, संजय जीवने, हुसेन ढोबरे, हरिभाऊ रामपुरे, शेख दिलदार, सुमित गेडाम, सचिन मेश्राम, विजय मेश्राम, विजय खाडे, वासूमित्र वनकर, मोरेश्वर खैरे, विनोद बदकी, ज्योतिबा पोटे, प्रा. सतीश पांडे, प्रफुल्ल भगत आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.    

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी