बार असोसिएशनच्या निवडणुकीत एकता पॅनलचे ७ तर विकास पॅनलचे ४ सभासद विजयी
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी बार असोसिएशनची (वकिल संघ) २५ जानेवारीला निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकता पॅनलचे ७ तर विकास पॅनलचे ४ सभासद निवडून आले. पुढील तीन वर्षासाठी बार असोसिएशनच्या ११ सभासदांची निवड करण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. अंतिम मतदार यादीतील १०५ वकिलांपैकी १०२ वकिलांनी या निवडणुकीत मतदान करून आपल्या मतांचा कौल दिला. ऍड. विरेंद्र महाजन यांचे एकता पॅनल व ऍड. निलेश चौधरी यांच्या विकास पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यात एकता पॅनलने बाजी मारली. दोनही पॅनलच्या प्रमुखांनी आपापल्या पॅनलचे सभासद निवडून आणण्याकरिता प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी सर्व मतदार वकिलांच्या भेटीगाठी घेत त्यांना आपापली भूमिका पटवून सांगितली. तसेच घोषणापत्रातही त्यांनी दिवाणी व फौजदारी न्यायालयासंदर्भातील वकिलांचे अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. तसेच वकिलांचे प्रश्न सोडविण्याकरिता कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत दोन्ही पॅनलने निवडणूक लढविली. मात्र मतदारांचा कौल एकता पॅनलला मिळाला. एकता पॅनलचे ७ सभासद निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. शाम गायकवाड यांनी अतिशय पारदर्शकपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सायंकाळी ७ वाजता त्यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. एकता पॅनलच्या सात सभासदांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर एकता पॅनलचे ऍड. विरेंद्र महाजन यांनी गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा केला.
वकिल संघाच्या पुढील तीन वर्षासाठी निवडून आलेल्या एकता पॅनलच्या सभासदांमध्ये अध्यक्ष ऍड, विरेंद्र महाजन, उपाध्यक्ष ऍड. यशवंत बरडे, सचिव ऍड. अमोल टोंगे, सहसचिव ऍड. रामेश्वर लोणारे, सदस्य ऍड. दिलीप परचाके, ऍड. चंदू भगत, ऍड. आकाश निखाडे यांचा समावेश आहे. तर विकास पॅनलच्या विजयी सभासदांमध्ये कोषाध्यक्ष ऍड. प्रेम धगडी, सदस्य ऍड. दुष्यंत बोरूले, ऍड. अविनाश बोधाने, ऍड. प्रतिक्षा शेंडे यांचा समावेश आहे. ऍड. निलेश चौधरी यांचे अध्यक्ष पद अवघ्या काही मतांनी हुकले. मात्र त्यांनी निवडणुकीत सभासदांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ऍड. निलेश चौधरी यांच्या विकास पॅनलने प्रतिस्पर्धी पॅनलला कडवी झुंज दिली. अतिशय रंगतदार झालेल्या या लढतीत शेवटी एकता पॅनलचे ७ सभासद विजयी झाले. बार असोसिएशनच्या निवडणूकीत एकता पॅनलचा विजय झाला. एकता पॅनलला आता निवडणूक घोषणापत्रात मांडलेले मुद्दे पूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
Comments
Post a Comment