एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ झाल्याने शिवसेना (उबाठा) आक्रमक, वणी आगारात केले चक्काजाम आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
महागाई प्रचंड वाढल्याने नागरिकांचं आधीच बजेट बिघडलेलं असतांना शासनाने एसटीची भाडेवाढ करून त्यात आणखी भर घातली आहे. निवडणूक आटोपताच शासनाने प्रवास दर व इतरही जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविण्याचा सपाटा सुरु केला आहे. महागाई वाढवून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे. महागाईचा आलेख प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांना कौटुंबिक गरजा भागविणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसमोर उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. महागाईचा भस्मासुर सर्वसामान्य नागरिकांना गिळंकृत करू पाहत असतांना शासन मात्र त्यांना आणखी महागाईकडे लोटतांना दिसत आहे. अशातच शासनाने एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करून नागरिकांवर आर्थिक बोजा लादला आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एसटी भाडेवाढीचा निषेध करीत शिवसेना वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने वणी आगारात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाकडून एसटीच्या तिकीट दरात करण्यात आलेली वाढ रद्द करावी अशी जोरदार मागणी यावेळी शिवसेनेकडून (उबाठा) करण्यात आली. वणी बसस्थानकात एक तास शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जगणं कठीण झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल, डिझल व गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होतांना दिसत नाही. जीएसटीमुळे सर्वच वस्तू महागल्या आहेत. महागाई नियंत्रणात आणण्याऐवजी महागाई वाढविण्यावर शासनाचा अधिक भर दिसून येत आहे. खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्याने लाडक्या बहिणींना भाजीला फोडणी देतांना प्रश्न पडू लागले आहेत. महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात अर्धी सूट देण्यात आली असली तरी दाजीच्या खिशाला कात्री लावण्याचं पद्धशीर काम शासनाकडून केलं जात आहे. शासनाने एसटीच्या प्रवास भाड्यात १४.९५ टक्के वाढ करून आधीच महागाइचे चटके सोसणाऱ्या जनतेला महागाईच्या वणव्यात लोटण्याचं काम केलं आहे. एसटीची भाडेवाढ केल्याने शिवसेना मात्र (उबाठा) प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने एसटीच्या तिकीट दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणी आगारात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेनेचे सुनिल कातकडे, संजय निखाडे. किरण देरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, प्रविण खानझोडे, भगवान मोहिते, जगन जुनगरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एसटी प्रवास भाड्यात करण्यात आलेली भाववाढ रद्द करावी अशी तीव्र मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. शासनाने महागाईवाढी विरुद्धच आपलं धोरण बदलवावं अशी जोरदार नारेबाजी यावेळी शिवसेनेकडून (उबाठा) करण्यात आली.
Comments
Post a Comment