घरासमोरील मुरूम उचलून नेणाऱ्या शेजाऱ्यांना हटकल्याने फावड्याने केली मारहाण, दोन महिलेसह तिघांवर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
पावसाचे पाणी अंगणात साचत असल्याने स्वखर्चाने घरासमोरील रोडवर टाकलेला मुरूम परस्पर उचलून नेत स्वतःच्या घरासमोरील अंगणात टाकणाऱ्या शेजाऱ्यांना हटकल्याने झालेल्या वादातून तिघांनी मिळून एकाला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यावर फावडे मारून त्याचे डोके फोडले. ही घटना वणी तालुक्यातील विरकुंड या गावात १० जुलैला सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दोन महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील विरकुंड या गावात राहणाऱ्या ऋषीकेश देविदास सातपुते (२५) याने पावसाचे पाणी अंगणात साचून राहत असल्याने स्वखर्चाने मुरूम विकत घेऊन घरासमोरील रोडवर टाकला. मात्र रोडवर टाकलेला मुरूम ग्रामपंचायतीने टाकल्याचा अंदाज बांधून शेजारी हे ऋषीकेश यांच्या घरासमोरील मुरूम परस्पर उचलून नेत आपल्या घरासमोर टाकू लागले. शेजारी त्यांनी विकत आणलेला मुरूम परस्पर उचलून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना हटकले. मुरूम मी स्वतः विकत आणला, तुम्ही का बरं मुरूम नेत आहे, असे म्हणताच शेजाऱ्यांनी त्यांच्या सोबत जोरदार वाद घातला. मुरूम ग्रामपंचायतीने टाकला आहे, आम्ही तो नेणार असे म्हणत शेजाऱ्यांनी घातलेला वाद विकोपाला जाऊन वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद घालणाऱ्या शेजारी महिलेने ऋषीकेश यांच्या डोक्यावर फावडे मारून त्यांना जखमी केले. तर एकाने फावड्याच्या दांड्याने ऋषीकेश यांच्या पाठीवर मारहाण केली.
शेजारी हे मुलाला मारहाण करीत असल्याचे पाहून आई मध्यस्थी करण्यास आली असता एका महिलेने त्यांच्या आईचे केस ओढून त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तिघे मिळून आई व मुलाला मारहाण करीत असतांना गावातीलच दोघांनी मध्यस्थी करून त्यांचा वाद सोडविला. मात्र महिलेने डोक्यावर फावडे मारल्याने ऋषीकेशच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्याने झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. ऋषीकेश सातपुते यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मंगला भाऊराव आत्राम (३५), संगिता देवराव पेटकर (३६), पवन देवराव पेटकर (२२) यांच्यावर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: