प्रशांत चंदनखेडे वणी
वणी नांदेपेरा रोड वरील लॉयन्स कॉलेज जवळ झालेल्या अपघातात राजूर (कॉ.) येथील व्यक्तीचा दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना ४ जुलैला रात्री ९.१० वाजताच्या सुमारास घडली. ईश्वर किशन गाडगे (५१) रा. राजूर (कॉ.) ह.मु. वणी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मूळचे राजूर (कॉ.) येथील रहिवाशी असलेले ईश्वर गाडगे हे हल्ली वणी येथील साधनकरवाडी येथे कुटुंबासह राहत होते. त्यांचा नांदेपेरा रोडवर अपघात होऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ईश्वर गाडगे यांचे नांदेपेरा रोडवरील गुप्ता ले-आऊट येथे नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. ते रोज बांधकामाची पाहणी करण्याकरिता त्याठिकाणी जायचे. ४ जुलैला रात्री ८.३० वाजता नेहमी प्रमाणे ते बांधकामाची पाहणी करण्याकरिता नांदेपेरा रोडने पायदळ जात असतांना त्यांना लॉयन्स कॉलेज जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतक ईश्वर गाडगे यांचा मुलगा तुषार ईश्वर गाडगे (२४) याने पोलिस स्टेशनला नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर बीएनएसच्या कलम २८१, १०६(१), सहकलम १३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वर गाडगे यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवार ५ जूनला दुपारी त्यांच्या राजूर (कॉ.) येथील राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. ईश्वर गाडगे यांच्या पश्च्यात पत्नी एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: