चायनीज स्टॉलवर राडा, शुल्लक कारणावरून चौघांची चायनीज विक्रेत्याला मारहाण, मध्यस्थी करणाऱ्याच्या हातावर मारला चाकू
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका चायनीज स्टॉलवर शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चायनीज विक्रेत्याला तेथे ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनी थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मध्यस्थी करण्यास गेलेल्या त्याच्या चुलत भावाच्या हातावर चाकू मारून त्याला जखमी केले. ही घटना ३ जुलैला सायंकाळी ७ वाजता साई मंदिर परिसरातील एसबीआय बँक जवळील चायनीज स्टालवर घडली. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.
शहरातील साई मंदिर परिसरातील एसबीआय बॅंकेजवळ तेली फैल येथे राहणाऱ्या कुणाल रमेश लोहकरे (३२) याचे चायनीज खाद्य विक्रीचे दुकान आहे. कुणालचा भाऊ रोहित हा देखील त्याला या व्यवसायात मदत करतो. ३ जूनला सायंकाळी ७ वाजता चार जण कुणालच्या चायनीज स्टॉलवर आले. त्यांनी चायनीज खाद्याची ऑर्डर दिली. मात्र दुकानात ग्राहकांची गर्दी असल्याने त्यांची ऑर्डर लावण्याला उशीर झाला. यावर त्यांनी चायनीज दुकानदाराला ऑर्डर लावण्याला एवढा उशीर का, असे म्हणत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेंव्हा कुणालने येथे महिला बसलेल्या आहेत, शिव्या कशाला देतो, असे म्हणताच तेथे ग्राहक म्हणून आलेल्या चौघांनीही त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या त्या चौघांपैकी एक जण त्याचा मावस भाऊ सारंग संजय साठोने (३४) रा. सिनरजी वार्ड कोसारा चंद्रपूर हा होता.
कुणालला मारहाण होत असल्याचे पाहून तेथे काम करणारा मजूर मध्यस्थी करण्याकरिता आला असता त्यालाही या चौघांनी मारहाण केली. त्यानंतर चायनीज स्टॉल वरील कल्लोळ ऐकून कुणालचा भाऊ रोहित व चुलत भाऊ लहेश वाल्मिक लोहकरे हे धावून आले. त्या दोघांनीही त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सारंग साठोने याने चायनीज स्टॉल वरील वापरता चाकू लहेश याच्या हातावर मारला. त्यामुळे लहेश जखमी झाला. त्यानंतर सारंग याने वडिलांच्या हातचा जुना हिशोब बाकी आहे, असे म्हणत जुन्या व्यवहाराचे पैसे मागितले, व सरळ गल्ल्यात हात घातला. तसेच कुणालला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन ते चौघेही तेथून निघून गेले. दरम्यान कुणालची पत्नी रेल्वे क्रॉसिंग कडून जात असतांना तिलाही सारंग याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सारंग साठोने याने लहेश याच्या मोबाईलवर फोन करून त्यालाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे मावस भाऊ सारंग साठोने याच्या मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीने भयभीत झालेल्या कुणालने सरळ पोलिस स्टेशन गाठून सारंग व त्याच्या तीन अनोळखी मित्रांविरुद्ध तक्रार नोंदविली. कुणाल लोहकरे याच्या तक्रारी वरून पोलिसांनी सारंग साठोने व त्याच्या तीन मित्रांवर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५१(४), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: