प्रशांत चंदनखेडे वणी
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी वणी येथील कोलडेपोमुळे निर्माण झालेल्या समस्या प्रखरपणे मांडल्या. औचित्याचे मुद्दे या सदरात त्यांनी वणी येथील प्रदूषण वाढीचा मुद्दा उपस्थित केला. कोलडेपोमुळे प्रदूषणात झालेली वाढ आणि कोळसा वाहतुकीमुळे वाढलेले अपघात या समस्येकडे त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले. कोळशाच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचे जनतेच्या आरोग्यावर होणारे दुरोगामी परिणाम याचा त्यांनी विधिमंडळात पाढाच वाचला. वणी येथील प्रदूषणाच्या समस्येला घेऊन ते विधिमंडळात गरजले. वणी येथील लालपुलिया परिसरात अनधिकृतपणे कोलडेपो थाटण्यात आले आहे. त्यामुळे या कोलडेपोची चौकशी व कोलडेपो धारकांवर कार्यवाही करण्याकरिता चौकशी समिती नेमण्याचीही मागणी त्यांनी विधिमंडळात केली.
मुंबई येथे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आमदार संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील मुद्दे मांडतांना लालपुलिया परिसरातील कोलडेपोमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाऊस पाडला. कोलडेपो हे वणी यवतमाळ या मुख्य महामार्गालगत असून कोलडेपो मधून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे या मार्गाने मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. कोलडेपोमध्ये सातत्याने कोळशाची वाहतूक सुरु असते. कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावरच रांगा लावून उभे असतात. या परिसरात असंख्य कोलडेपो असल्याने कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांची येथे सर्कस सुरु असते. कधी कोणता ट्रक कोणत्या कोलडेपोतुन निघेल याचाही नेम नसतो. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाणही प्रचंड वाढले आहेत. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेल्या अपघातात कित्येक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
कोलडेपोमध्ये कोळशाची इंटरनल वाहतूक करणारे ट्रक पासिंग क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरून रस्त्याने धावत असल्याने नव्याने बांधलेले रस्तेही उखडू लागले आहेत. रहिवाशी वस्त्यालगत हे कोलडेपो असल्याने येथील नागरिकांना कोलडेपो मधून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीचा नेहमी सामना करावा लागतो. तसेच या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. धूळ प्रदूषणामुळे येथील नागरिकांना अनेक दुर्धर आजार जडले आहेत. गंभीर आजारांनी येथील नागरिकांना ग्रासले आहे. श्वसनाचे रोग, त्वचारोग, नेत्ररोग, फुफ्फुसाचे आजार व व्ह्रदय विकारासारख्या आजारांना येथील नागरिक बळी पडू लागले आहेत. कोळसा वाहतुकीच्या ट्रकांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व परजिल्ह्यातील चालक कार्यरत आहेत. तसेच कोलडेपोमध्येही परप्रांतीयांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही माहिती होत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत.
कोळशाच्या धूळ प्रदूषणाने येथील जनजीवन प्रभावित झालं आहे. प्रदूषित वातावरणात नागरिकांचं श्वास घेणं कठीण झालं आहे. धूळ प्रदूषणाचा पर्यावर्णावरही विपरीत परिणाम होत आहे. धूळ प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून त्यांचं आयुर्मान घटू लागलं आहे. धूळ प्रदूषणात भर घालणारे हे कोलडेपो अनधिकृतपणे येथे थाटण्यात आले आहेत. त्यामुळे या कोलडेपोंना देण्यात आलेल्या परवानगीची चौकशी करून कोलडेपो धारकांवर कार्यवाही करण्याकरिता चौकशी समिती नेमण्याची मागणी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली. कोलडेपोमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाने व कोळशाच्या वाहतुकीने जनजीवन धोक्यात आले असल्याचा मुद्दा आमदार देरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रखरतेने मांडला.
No comments: