Latest News

Latest News
Loading...

पायदळ घराकडे जाणाऱ्या वृद्धाला पाणी विक्रीच्या वाहनाने दिली मागून जबर धडक


प्रशांत चंदनखेडे वणी 

जगन्नाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन पायदळ घराकडे जात असलेल्या वृद्ध इसमाला पाणी विक्रीच्या वाहनाने मागून धडक दिल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. ही घटना २३ जूनला सकाळी ९.३० वाजता गणेशपूर येथील उमेद पार्क जवळ घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील गणेशपूर येथे राहणारे महादेव पैकाजी मेश्राम (७५) हे सकाळी नेहमी गावातील जगन्नाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनाकरिता जातात. २३ जूनला नित्यनियमाने ते जगन्नाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परतत असतांना मागून येणाऱ्या पाणी विक्रीच्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या तोंडाला, डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर अपघाताची माहिती महादेव मेश्राम यांचा मुलगा गोपाल महादेव मेश्राम (४३) याला मिळाल्यानंतर त्याने लगेच ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्याच्या वडिलांवर उपचार सुरु होते. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. 

त्यामुळे त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगून त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना चंद्रपूर वरून नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना सावंगी मेघे रुग्णालयात भरती करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान गोपाल मेश्राम याने अपघात झालेल्या ठिकाणी एका घरी लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्याला पायदळ जात असलेल्या त्याच्या वडिलांना पाणी विक्रीच्या वाहनाने (टाटा एस, MH ३४ AB ३८३४० ) मागून धडक दिल्याचे आढळून आले. या पाणी विक्रीच्या वाहनावर गंगाजल असे लिहिले होते. गोपालने या वाहनावरील चालकाबाबत माहिती काढली असता चालकाचे नाव गोविंदा अरुण कुळमेथे (२०) रा. कोरंबी (मारेगाव) असल्याचे समोर आले. 

त्यामुळे निष्काळजीपणे वाहन चालवून वडिलांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या गोविंदा कुळमेथे या वाहन चालकाविरुद्ध गोपाल मेश्राम याने २८ जूनला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी वाहन चालक गोविंदा कुळमेथे याच्यावर बीएनएसच्या कलम १२५(a), १२५(b), २८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.