Latest News

Latest News
Loading...

महाराष्ट्रात मराठीच, मनसेच्या एल्गाराने सरकार नमले

प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने शासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी विषय लादण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ५ जुलैला भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करताच सरकार नरमले आणि मराठी शाळांमध्ये हिंदी विषयाची सक्ती करण्याचे ते दोन्ही निर्णय मागे घेतले. मनसेने मराठीची अस्मिता जपण्याकरिता घेतलेल्या भूमिकेला यश मिळाल्याने शहरातही मनसे सैनिकांकडून जल्लोष करण्यात आला. मनसे नेते राजू उंबरकर यांनी स्वतः मनसे कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भर पावसात ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

राज्यातील मराठी शाळांमध्ये पहिली पासून हिंदीची सक्ती करण्याचा शासनाने निर्णय जाहीर करताच मनसे आक्रमक झाली. मनसेने शासनाच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवून सरकार विरोधात दंड थोपटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाच्या या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत ५ जुलैला मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र मोर्चा पूर्वीच सरकारने आपले पाऊल मागे घेतले. मराठी शाळांमध्ये पहिली पासून हिंदीची सक्ती करण्याचे ते दोन्ही निर्णय रद्द केले. बालवयात मराठी विद्यार्थ्यांवर हिंदीचा बोजा लादण्याच्या सरकारच्या या निर्णयाने मनसे प्रचंड आक्रमक झाली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मनसेने शेवटी भव्य मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. परंतु त्यापूर्वीच शासनाने आपले दोन्ही निर्णय रद्द केले. त्यामुळे मनसे सैनिकांनी प्रचंड जल्लोष करीत यशाचा हा आनंद साजरा केला. 

मनसे नेते राजू उंबरकर यांनीही भर पावसात कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. मनसे सैनिकांनी प्रचंड जल्लोष करीत बालमनावर हिंदीचा पगडा निर्माण करण्याचा शासनाचा तो निर्णय हाणून पाडल्याचा आनंद साजरा केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मराठी एकजुटीच्या विजयाच्याही घोषणा देण्यात आल्या. मनसे सैनिकांच्या या आनंदोत्सवाने शहरातील वातावरण मराठीमय झाल्याचे अनुभवायला मिळाले. यावेळी मनसे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Powered by Blogger.