Latest News

Latest News
Loading...

वणीत महात्मा फुले जयंतीनिमित्त स्मारकाचे अनावरण; उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत चंदनखेडे वणी :-

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त “सार्वजनिक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव २०२६” अंतर्गत आयोजित स्मारक अनावरण सोहळा शनिवारी (दि. ११ एप्रिल) सायंकाळी दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

या सोहळ्याला आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा विद्या आत्राम, काँग्रेस नेते संजय खाडे, उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक नागरिक, महिला, युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर महिलांनी पारंपरिक औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर महात्मा फुले स्मारकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेतील कार्याचा गौरव करत शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षणाची पायाभरणी आणि जातिभेद निर्मूलनासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली. १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी समाजात परिवर्तनाची नवी दिशा दिली, असे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान “जय ज्योती, जय क्रांती” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. उपस्थितांनी समता, बंधुता आणि शिक्षणाच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमामुळे वणी शहरात महात्मा फुले जयंतीचा उत्साह अधिकच वाढला असून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम ठरला.

No comments:

Powered by Blogger.