Latest News

Latest News
Loading...

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मंदिर’ ठरतेय वणीतील महात्मा फुले अभ्यासिका


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वणीतील ‘स्व. रामचंद्र खाडे स्मृतीशेष महात्मा फुले अभ्यासिका’ ही खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. संजय खाडे फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणारी ही अभ्यासिका आज अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मंदिर’ बनली आहे.

स्पर्धेच्या युगात दर्जेदार अभ्यासाची गरज ओळखून, अत्यल्प शुल्कात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा ध्यास या अभ्यासिकेने घेतला आहे. शांत, अभ्यासपूरक वातावरण, शुद्ध पिण्याचे पाणी, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येतात. यासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर बाबींमध्येही सातत्याने मदत केली जाते.

या उपक्रमामुळे आजवर शेकडो विद्यार्थी शासकीय व सहकार क्षेत्रात उच्च पदांवर विराजमान झाले असून, अनेकांच्या यशामागे या अभ्यासिकेचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ही अभ्यासिका केवळ अभ्यासाची जागा न राहता विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे केंद्र बनली आहे.

दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी सकाळी अभ्यासिकेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अभ्यासिकेचे संकल्पक संजय खाडे व प्रशिक्षक प्रा. वैभव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि ध्येयपूर्तीचे महत्त्व पटवून दिले.

संजय खाडे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला योग्य दिशा देणे हेच अभ्यासिकेचे ध्येय असल्याचे सांगितले. तसेच ईश्वर खाडे व धनंजय खाडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.

या कार्यक्रमाला अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी वातावरणात विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन करत शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त केला.

वणी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आता आशेचा किरण ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग येथे खुला होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

No comments:

Powered by Blogger.