Latest News

Latest News
Loading...

खाण प्रभावित भागातील शेकडो शिक्षक पदे रिक्त; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न विधानसभेत


प्रशांत चंदनखेडे वणी :-

खाण प्रभावित वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुक्यांतील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये शेकडो शिक्षकांची पदे रिक्त असल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. हा गंभीर प्रश्न आमदार संजय देरकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत शासनाला जाब विचारला. रिक्त पदे तातडीने भरून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्याची जोरदार मागणी त्यांनी केली.

आमदार देरकर यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार, झरी-जामणी तालुक्यात मंजूर ३०५ शिक्षक पदांपैकी तब्बल १०१ पदे रिक्त असून १३ शाळा पूर्णपणे शून्य शिक्षकी आहेत. वणी तालुक्यात १०४ शिक्षक पदे रिक्त असून १८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, तर मारेगाव तालुक्यात ८३ पदे रिक्त असून १५ शाळा शिक्षकांविना आहेत. या तिन्ही तालुक्यांमध्ये सुमारे ३०० शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षेची तयारी यावर विपरीत परिणाम होत असून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
खाण प्रभावित भागातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असताना, त्याच भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत आमदार देरकर यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याची, शून्य शिक्षकी शाळांना प्राधान्याने शिक्षक उपलब्ध करून देण्याची तसेच खनिज विकास निधीतून आवश्यकतेनुसार कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न केवळ आश्वासनांवर न ठेवता शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका आमदार संजय देरकर यांनी विधानसभेत मांडली. त्यांच्या या मागणीमुळे खाण प्रभावित भागातील शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर ऐरणीवर आला आहे.

No comments:

Powered by Blogger.