Latest News

Latest News
Loading...

सहकार, समाजसेवा आणि जनजागृतीचा संगम; वणीत 'सहकार सप्ताह २०२६'चा दिमाखदार समारोप


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सहकार ही केवळ आर्थिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची प्रभावी शक्ती आहे, हा संदेश देत सहकार सप्ताह समिती, वणी यांच्या वतीने आयोजित 'सहकार सप्ताह २०२६' चा शुक्रवारी (३ जुलै) शेतकरी मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. "बिना संस्कार नही सहकार... बिना सहकार नही उद्धार" या ब्रीदवाक्याला साजेशा विविध उपक्रमांनी सप्ताहभर वणीत सहकार, समाजसेवा आणि जनजागृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

समारोप सोहळ्याची सुरुवात वायडीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विनायकराव एकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. देविदास काळे होते. माजी सहकार विकास अधिकारी कवडुजी नगराळे यांनी सहकार चळवळीचे बदलत्या काळातील महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सहाय्यक निबंधक सचिन कुडमेथे, चंद्रशेखर खोंड, संजय खाडे, टिकाराम कोंगरे, गजानन बेजंकीवार, प्रमोद वासेकर, डॉ. स्वप्नील गोहोकार, सौ. किरण देरकर, विलास मांडवकर, विवेकानंद मांडवकर, सुरेश बर्डे, पंकज चिकटे, अशोकराव सूर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी सहकार विषयावरील प्रशिक्षण सत्र उत्साहात पार पडले. सप्ताहभर आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाला सहकार संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, नेत्रतपासणी शिबिर, रांगोळी स्पर्धा अशा विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे सहकार चळवळीची सामाजिक बांधिलकी अधिक ठळकपणे अधोरेखित झाली.

सहकार सप्ताह समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे संपूर्ण सप्ताह यशस्वी ठरला. सहकाराचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा आणि समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनतेशी नाते अधिक दृढ करण्याचा या सप्ताहाचा उद्देश सार्थ ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वणीतील सहकार चळवळीला नवी दिशा आणि नवी ऊर्जा देणारा हा सप्ताह ठरल्याची प्रतिक्रिया सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.