Latest News

Latest News
Loading...

परराज्यातील मतदार नोंदणीवर मनसेचा आक्षेप; 'प्रत्येक अर्जाची सखोल चौकशी करा'

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर आक्षेप नोंदवत प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करून मतदार यादीतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी प्रत्येक अर्जाची काटेकोर पडताळणी करण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, वणी तालुक्यात उद्योग आणि खनिज प्रकल्पांमुळे विविध राज्यांतील कामगार वास्तव्यास आहेत. मात्र, काही नागरिकांची नावे त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीत कायम असताना देखील वणी विधानसभा मतदारसंघातही मतदार म्हणून नोंदणीसाठी ते अर्ज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे नाव मूळ राज्यातील मतदार यादीतून वगळण्यात आले आहे किंवा त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, याची अधिकृत खात्री झाल्यानंतरच वणीच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजू उंबरकर यांनी यापूर्वीही वणी विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदार व परप्रांतीय मतदारांच्या मुद्द्यावर राज्य निवडणूक कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते. विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून सर्व अर्जांची अत्यंत सखोल आणि कायदेशीर पडताळणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, आधीपासून मतदार यादीत समाविष्ट असलेल्या परराज्यातील नागरिकांच्या नावांची त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीशी पडताळणी करावी. दोन राज्यांच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव असल्याचे आढळल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० तसेच इतर लागू कायद्यांनुसार तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मतदार यादीची पवित्रता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी तसेच भविष्यात बोगस मतदान किंवा दुबार नोंदणीसारखे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्य निवडणूक आयुक्त (मुंबई), विभागीय निवडणूक अधिकारी (अमरावती) तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, मनसेच्या या मागणीमुळे वणी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागली असून, विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.

यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, गोविंद थेरे, अनिल टोंगे, परसराम खंडाळकर, मयूर घाटोळे, मयूर गेडाम, आशिष ठावरी, मनोज उरकुडे, लक्ष्मण उपरे, भोला चिकनकर, गुड्डू धोटे, हितेश पचारे, प्रतीक बुरडकर, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धीरज बगवा आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.