Latest News

Latest News
Loading...

गोवंश जनावरांच्या पुष्पा स्टाईल तस्करीचा डाव एलसीबी पथकाने उधळला, ५ वाहनांसह ४३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कत्तलीच्या उद्देशाने पैनगंगा नदी पात्रातून तेलंगणा राज्यात नेण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांच्या तस्करीचा मोठा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर गोटा येथे पहाटे टाकलेल्या धाडीत पथकाने ३४ गोवंशीय बैलांची सुटका करत पाच वाहने जप्त केली, तर सहा आरोपींना अटक करून ४३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यवतमाळ जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला सोमवारी पहाटे २.३० वाजता गोपनीय माहिती मिळाली की, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बाजारांतून खरेदी केलेले गोवंशीय बैल पिकअप वाहनांत भरून मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर गोटा येथे आणले जात असून, तेथून पैनगंगा नदीच्या पात्रातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी पाठविण्याची तयारी सुरू आहे.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि मुकुटबन पोलिसांनी संयुक्तपणे पहाटे साडेसहा वाजता सापळा रचला. प्रवासी निवाऱ्याजवळ वाहनांतून जनावरे उतरविण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांनी धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पाच वाहने आणि ३४ गोवंशीय बैल जप्त करण्यात आले. जनावरांना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.

या प्रकरणी अक्षय किशोर बोळे, अजीत दादाजी बारतीने, प्रफुल शामराव नंदुरकर, विठ्ठल शंकर उमरे, अजय भारत पिदुरकर तसेच ज्ञानेश्वर उर्फ नागेश भोयर यांना अटक करण्यात आली. एलसीबी पथकाच्या चौकशीत स्थानिक आरोपींनी तेलंगणातील व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून मजुरीच्या मोबदल्यात गोवंशीय जनावरे नदीपात्रातून सीमापार पोहोचविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.

जप्त करण्यात आलेल्या सर्व गोवंशीय जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षिततेसाठी गुरु गणेश गोरक्षण रासा, वणी येथे सुपूर्द करण्यात आले.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध पशुक्रूरता प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चवरे, मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दत्ता पेंडकर, मुकुटबनचे पोउपनि सुदाम आसोरे, पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अमीत पोयाम, पोका रजनीकांत मडावी, सतीश फुके व बादल जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

पहाटेच्या या अचूक आणि धाडसी कारवाईने गोवंश तस्करांचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय साखळीला मोठा धक्का बसला असून, फरार आरोपींच्या अटकेनंतर या रॅकेटबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


No comments:

Powered by Blogger.