Latest News

Latest News
Loading...

‘शिक्षक द्या, शिक्षक द्या!’; शिक्षकांच्या रिक्त पदांवरून विधानभवनात आमदार संजय देरकर आक्रमक

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर विधानभवनाच्या पायऱ्यांवर धडकला. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी राजकारण चालणार नाही," असा इशारा देत आमदार संजय देरकर यांनी मंगळवारी सरकारविरोधात आक्रमक निदर्शने केली. शिक्षक भरती प्रक्रियेत विरोधी पक्षाच्या मतदारसंघांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारला थेट जाब विचारला.

वणी, मारेगाव आणि झरी-जामणी या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये शेकडो शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शाळा शिक्षकांविना आहेत, तर काही ठिकाणी एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी आहे. या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे देरकर यांनी आंदोलनादरम्यान ठामपणे मांडले.

देरकर यांनी सरकारवर थेट निशाणा साधत, "शिक्षक भरतीचा निकष विद्यार्थ्यांची गरज असायला हवा; राजकीय निष्ठा नव्हे," असे स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतल्यास विरोधी पक्षाच्या आमदारांचे प्रतिनिधित्व असलेल्या मतदारसंघांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भरती प्रक्रियेत राजकीय भेदभाव होत असल्याचा संशय अधिक बळावल्याचेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनाला विविध पक्षांतील आमदारांनीही भेट देत पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे हा प्रश्न केवळ वणीपुरता मर्यादित न राहता विधानभवनात चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार संजय देरकर यांच्याशी चर्चा केली. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आंदोलनानंतर आमदार देरकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, वणी विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांची सर्व रिक्त पदे तातडीने भरली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.

शिक्षकांच्या रिक्त पदांवरून विधानभवनात घुमलेला हा आवाज आता सरकार कृतीत उतरवते की केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहतो, याकडे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.