Latest News

Latest News
Loading...

बोगस बियाण्यांनी पेरण्या उध्वस्त; बियाणे कंपन्यांविरोधात मनसेचा एल्गार, नूकसानभरपाईच्या मागणीसाठी कृषी विभागावर धडक

प्रशांत चंदनखेडे वणी :-

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरल्या गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांढरकवडा येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी अधिकारी यांची भेट घेऊन बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.

यंदा अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही बियाण्यांची उगवणच न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. विशेषतः 'हुतुतू' या सोयाबीन बियाण्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाऊस, कर्ज आणि वाढता उत्पादन खर्च यांच्याशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांची बोगस बियाण्यांमुळे आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेने कृषी विभागाकडे बाधित शेतकऱ्यांच्या शेतांचे तातडीने पंचनामे करण्याची, संबंधित बियाणे कंपनी आणि विक्रेत्यांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तसेच शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

यावेळी फाल्गुन गोहोकार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देतांना म्हटले की, "शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. दोन ते तीन दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर कृषी विभागाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल."

निवेदनदेतेवेळी गोविंद थेरे, संजय गौरकर, आशिष ठावरी, सोमेश्वर ढवस, धीरज पेचे, मनोज उरकुडे, सुमित ठेंगणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतल्याने कृषी विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.