प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरालगत असलेल्या वागदरा (नवीन) येथील विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार ८ जुलैला पहाटे उघडकीस आली. मनिषा रवि बोथले वय अंदाजे ४२ वर्षे असे या गळफास घेतलेल्या विवाहितचे नाव आहे.
तालुक्यातील वागदरा येथे कुटुंबासह राहत असलेल्या या महिलेने घरातील खोलीत गळफास लावून आपले जीवन संपविले. तिने कुठल्या विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घेतला हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी तिच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली आहे. सुखी सांसारिक जीवन सुरू असतांना आणि संसार वेलीवर दोन फुलं उमललेली असतांना तिने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. या विवाहित महिलेच्या आत्महत्या करण्याला नैराश्येची किनार आहे, की कारण काही वेगळेच आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
मृतक महिलेचा पती रवि बोथले हा ट्रक चालक असून तो खंबीरपणे आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. सगळं काही सुरळीत सुरु असतांना महिलेने घरातच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेने संपूर्ण गाव हळहळले असून गावात शोककळा पसरली आहे. पहाटे मनिषा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. महिलेच्या आत्महत्या करण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलीस महिलेच्या आत्महत्या करण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनिषा बोथले या महिलेच्या पश्च्यात पती, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

No comments: