घाटंजी शहरात घातक शस्त्रांच्या बळावर दहशत माजविण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात एका सराईत गुन्हेगाराला दोन धारदार तलवारींसह रंगेहात ताब्यात घेत पथकाने संभाव्य गंभीर गुन्हा घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत आरोपीच्या स्विफ्ट डिझायर कारसह ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबवत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांना विश्वसनीय माहिती मिळाली. घाटंजीतील बेघर घाटी परिसरातील सराईत गुन्हेगार अनिल उत्तम जाधव (वय २९) हा दोन घातक तलवारी घेऊन खापरी नाका परिसरात स्विफ्ट डिझायर कारमध्ये थांबल्याची माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
खापरी नाक्याजवळ पथकाने कारला सिनेस्टाइल घेराव घालत आरोपीला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत निळ्या रंगाच्या पोत्यात लपवून ठेवलेल्या दोन धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारींचा वापर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या तत्काळ जप्त केल्या.
कारवाईदरम्यान दोन तलवारी आणि आरोपीची स्विफ्ट डिझायर कार असा ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी ही शस्त्रे कोणत्या उद्देशाने घेऊन आला होता, त्याचे इतर साथीदार आहेत काय आणि तो कोणता कट रचनार होता, या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोहवा सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदूरकर, पो.शि. रजनीकांत मडावी, नरेश राऊत व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
संभाव्य रक्तरंजित कट उधळून लावणाऱ्या या कारवाईमुळे घाटंजी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

No comments: