वणी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आता लढा संघटना आक्रमक झाली आहे. शहरातील चौकाचौकांत उभारण्यात आलेले अनधिकृत वाहन थांबे, बेकायदेशीर पार्किंग आणि वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, वणी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच मुख्य मार्गांवर ऑटो, ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहनांनी अनधिकृत थांबे निर्माण केल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. परिणामी रोजच वाहतूक कोंडी होत असून नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेषतः शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांचाही वेग वाहतूक कोंडीमुळे मंदावत असल्याची गंभीर बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली. चौकांमध्ये बेकायदेशीररीत्या वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लढा संघटनेने प्रशासनाकडे शहरातील सर्व अनधिकृत वाहन थांबे तात्काळ हटविणे, चौकाचौकांत नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, ऑटो व प्रवासी वाहनांसाठी अधिकृत थांबे निश्चित करून दिशादर्शक फलक लावणे, विशेष वाहतूक मोहीम राबविणे तसेच मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा लढा संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे, आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, सुभाष लसनत्ते, तानबाजी कडू यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
.jpeg)
No comments: