Latest News

Latest News
Loading...

बांधकाम साहित्याच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये राडा; विटेच्या हल्ल्यात दोघे जखमी, तिघांविरुद्ध गुन्हा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

घराच्या बांधकामासाठी आणलेले साहित्य शेजाऱ्याच्या अंगणात ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहचला. काही क्षणातच दोन कुटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर हल्ला चढविताना विटा फेकून मारहाण, ढकलाढकली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले. या प्रकरणी मारहाण झालेल्या कुटुंबातील महिलेच्या तक्रारीवरून शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील तीन सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वणी तालुक्यातील पळसोनी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा राजेंद्र वाडके (४२, रा. पळसोनी) या १२ जुलै रोजी सायंकाळी घरी असताना शेजारी राहणाऱ्या रेखा रामाजी नावडे यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या बांधकामाच्या विटा व लोखंडी सळ्यांवरून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळातच शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

फिर्यादीनुसार, वाद सोडविण्यासाठी आलेल्या पूनचंद महादेव वाडके यांना आशिष रामाजी नावडे याने विट फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला व कानाला दुखापत झाली. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या राजेंद्र महादेव वाडके यांना ढकलून दिल्याने ते खाली पडून जखमी झाले.

दरम्यान, वाद शांत करण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादी वर्षा वाडके यांच्या मानेवरही विटेने मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याचवेळी रामाजी नवले यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर वर्षा वाडके यांनी वणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रेखा रामाजी नावडे, आशिष रामाजी नावडे आणि रामाजी नावडे यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीएनएसच्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

शेजारधर्माला तडा

किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वाद थेट विटेच्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने पळसोनी गावात खळबळ उडाली आहे. बांधकाम साहित्याच्या वादातून हिंसाचार घडल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.