![]() |
| संग्रहित फोटो |
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरातील किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून चार जणांनी भररस्त्यात कार अडवून पानठेला व्यावसायिक व त्याच्या मित्रावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वणी पोलिसांनी सोयीस्करपणे प्रकरण हाताळत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरदीन आतिक अहमद (वय २६, रा. सभा कॉलनी, वणी) हा रंगनाथनगर येथे पानठेला चालवितो. १० जुलै रोजी इदगाह परिसरात कार चालवत असताना अनिल येमुलवार याचा वाहन ओव्हरटेक करण्यावरून फरदीनशी किरकोळ शाब्दिक वाद झाला. त्यावेळी माफी मागून फरदीन तेथून निघून गेला होता.
मात्र दुसऱ्याच दिवशी, ११ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फरदीन आपला मित्र तौकीर शेख याच्यासोबत कारने टिळक चौकाकडे जात असताना लाठीवाला पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन दुचाकी आडव्या लावून त्यांची कार अडविण्यात आली. त्यानंतर अनिल येमुलवार याच्यासह त्याच्या साथीदारांनी फरदीनला जबरदस्तीने कारमधून बाहेर काढून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फरदीनला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या तौकीर शेख यालाही आरोपींनी स्टीलच्या कड्याने मारहाण केल्याने त्याच्या छाती, मान, दंड आणि गुडघ्याला दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी अनिल विनायक येमुलवार (२५), अजय विनायक येमुलवार (२१) दोघेही रा. खरबडा मोहल्ला आणि मारेगाव येथील संतोष दत्ता चौगुले (२५) व महेश भगवान माशिरकर (२२) यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
भररस्त्यातील दादागिरीने नागरिकांमध्ये चिंता
भरदिवसा सार्वजनिक रस्त्यावर वाहन अडवून मारहाण केल्याच्या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

No comments: