Latest News

Latest News
Loading...

पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी; अखेर पालकांच्या संतापानंतर पाठ्यपुस्तकांचे वितरण


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नांदेपेरा मार्गावरील एका नामांकित सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत पाठ्यपुस्तकांच्या प्रचंड तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः खोळंबल्याची धक्कादायक बाब समोर आली. शैक्षणिक सत्र सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही बहुतांश विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके मिळाली नव्हती. त्यामुळे पालकांना दररोज शाळेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. अखेर पालकांची वाढती नाराजी आणि संतप्त प्रतिक्रियेनंतर सोमवारी (१३ जुलै) शाळा व्यवस्थापनाने पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू केले.

२४ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पालकांनी मुलांसाठी पाठ्यपुस्तके खरेदी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली; मात्र त्यानंतर 'पुस्तकांचा स्टॉक संपला आहे' असे कारण देत वितरण थांबविण्यात आले. परिणामी अनेक विद्यार्थी पुस्तकांशिवायच वर्गात उपस्थित राहत होते.

पाठ्यपुस्तके नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेणे, गृहपाठ पूर्ण करणे आणि नियमित अध्ययन करणे कठीण झाले होते. शाळेकडून वेळेवर पुस्तके उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. दररोज शाळेत चौकशी करूनही निश्चित उत्तर मिळत नसल्याने पालकांमध्ये अस्वस्थता वाढत होती.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणाऱ्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच मूलभूत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात झालेला विलंब हा व्यवस्थापनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पालकांच्या वाढत्या रोषाची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने वेगाने हालचाली करत १३ जुलै रोजी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये आणि शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.