अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी निधीबाबत उपस्थित झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात शनिवारी रामभक्तांचा संताप रस्त्यावर उतरला. जागृती मारोती मंदिर, आंबेडकर चौक येथे आयोजित 'रामरक्षा आंदोलन' आणि सामूहिक महाआरतीतून देणगी व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेकडो रामभक्त सहभागी झाल्याने परिसर 'जय श्रीराम'च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
आंदोलनाचे नेतृत्व आमदार संजय देरकर यांनी केले. त्यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती करून रामललाच्या चरणी प्रार्थना केली. त्यानंतर बोलताना त्यांनी, "श्रीराम मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला प्रत्येक रुपया हा कोट्यवधी हिंदूंच्या विश्वासाचे प्रतीक आहे. त्या निधीबाबत निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी भूमिका मांडली.
मंदिरासाठी अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या विटा आणि इतर मौल्यवान वस्तूंबाबतही सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. हा संघर्ष कोणत्याही राजकीय हेतूने नसून श्रद्धा, पारदर्शकता आणि जनविश्वासाचे संरक्षण करण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात सहजिल्हाप्रमुख संजय निखाडे, किरण देरकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, गटनेते सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचनकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, टीमनताई टोंगे, कीर्तीताई देशकर, सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश कराड, सुरेश देशकर, डॉ. जगन जूनघरी, कुंदन टोंगे, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो रामभक्त उपस्थित होते.
सामूहिक महाआरती, श्रीरामाच्या जयघोष आणि धर्मरक्षणाच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. आंदोलनामुळे शहरात दिवसभर या विषयाची चर्चा रंगली असून, श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवहाराबाबत पारदर्शक चौकशीची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

No comments: