प्रशांत चंदनखेडे वणी :-
पूर्व वैमनस्यातून मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाने अखेर हिंसक वळण घेतले. भरदिवसा एका मजुरावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने मानवी प्रवृत्ती हिंसक बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. शेताकडे निघालेल्या एका मजुराला भररस्त्यात अडवून शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करण्यात आली. डोक्यावर व हात-पायांवर काठीने जोरदार प्रहार करण्यात आल्याने मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या खळबळजनक घटनेनंतर मारेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलीक घनश्याम ठमके (४५, रा. आपटी) आणि नंदू उर्फ नंदलाल माधव आत्राम (५५, रा. आपटी) यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून तीव्र स्वरूपाचा वाद सुरू होता. या वादातून आरोपीने फिर्यादीला वारंवार जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या होत्या. या प्रकरणाशी संबंधित खटला सध्या न्यायालयात सुरु असल्याचेही समोर आले आहे.
शनिवारी (११ जुलै) दुपारी २ वाजताच्या सुमारास पुंडलीक ठमके हे शेताकडे जात असताना आरोपीने सार्वजनिक रस्त्यावर त्यांचा मार्ग अडवला. अश्लील शिवीगाळ करत आरोपीने त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. संतापाच्या भरात त्याने घरासमोरील काठी उचलून पुंडलिक ठमके यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर आणि पायांवर निर्दयीपणे वार केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात ठमके रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
फिर्यादीच्या जबाबावरून मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत आरोपी नंदू उर्फ नंदलाल आत्राम याला काही तासांतच अटक केली.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी बुरकुले, सहायक फौजदार दिगंबर किनाके आणि पोलीस शिपाई प्रवीण वारंजे करीत आहेत.
भरदिवसा सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या या हिंसक हल्ल्यामुळे आपटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, किरकोळ वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

No comments: