Latest News

Latest News
Loading...

दारूच्या नशेत धिंगाणा अन् वृद्धेवरही हल्ला; नातवाला वाचवायला गेलेल्या आजीला रस्त्यावर ढकलले

प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारूचे व्यसनी असलेले दोन जण दारूच्या नशेत नेहमी घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने त्यांना जाब विचारणाऱ्या कुटुंबावरच त्यांनी हल्ला चढविला. संतापाच्याभरात या दारुड्यांनी आधी नातवाला बेदम मारहाण केली. तर नंतर त्याच्या बचावासाठी धावलेल्या ७२ वर्षीय वृद्धेलाही धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलले. ही संतापजनक घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला माणिक कुमरे (वय ७२) या मार्डी येथील रहिवासी असून त्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराजवळ राहणारे पांडुरंग मडावी (३२) आणि चंद्रशेखर सूर्यभान मडावी (३०) हे दारूच्या नशेत नेहमी घरासमोर येऊन शिवीगाळ करत असल्याची तक्रार आहे.

बुधवारी (८ जुलै) रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही परत मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यावेळी घराबाहेर उभ्या असलेल्या फिर्यादीच्या नातवाशी त्यांनी विनाकारण वाद घालत अश्लील शिवीगाळ सुरू केली. याचा जाब विचारताच संतापलेल्या आरोपींनी नातवाला थपडा-बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.

नातवाला मारहाण होत असल्याचे पाहून आजी चंद्रकला कुमरे या मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. मात्र, आरोपींनी त्यांनाही न जुमानता मारहाण करून रस्त्यावर ढकलले. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी वृद्धेने मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पांडुरंग मडावी आणि चंद्रशेखर मडावी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 115(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.