Latest News

Latest News
Loading...

'चप्पल' परत करण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावले; टिळक चौकात लाकडी काठीने केला हल्ला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

घरगुती वादानंतर चप्पल परत करण्याच्या बहाण्याने युवकाला टिळक चौकात बोलावून त्याच्यावर लाकडी काठीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ जुलैला रात्री ८ वाजता वणी शहरातील टिळक चौक येथे घडली. या हल्ल्यात एक युवक जखमी झाला असून, पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांसह चौघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमनगर येथील जिनान जुबेर खान (१८) याला त्याचा मित्र अविराज सुरपाम याने घरगुती वाद सुरू असल्याचे सांगून चिखलगाव येथे बोलावून घेतले. जिनान खान हा आपल्या मित्रांसह सुरपाम याच्या घरी पोहचला असता, तेथे अनिकेत सोनटक्के (१८) व त्याचे दोन अल्पवयीन मित्र उपस्थित होते. यावेळी  अविराजच्या बहिणीच्या बॅगेवरून दोन्ही बाजूने मोठा शाब्दिक वाद झाला. मात्र काही वेळानंतर अनिकेत सोनटक्के व त्याचे मित्र तेथून निघून गेले.

मात्र, त्यानंतर त्यांच्यातीलच एका अल्पवयीन तरुणाने जिनानच्या मित्राला फोन करून आपली चप्पल घटनास्थळी राहिल्याचे सांगत ती टिळक चौकात आणून देण्यास सांगितले. जिनान व त्याचे मित्र चप्पल घेऊन तेथे पोहोचताच आरोपींनी अचानक जिनानवर हल्ला चढविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, प्रेम (१७, नाव बदलेले) याने हातातील लाकडी काठीने जिनानच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, तर प्रितेश (१७, नाव बदलेले) याने थपडा-बुक्क्यांनी मारहाण केली. अनिकेत सोनटक्के याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याचवेळी अविराज सुरपाम व त्याचे वडील विनोद सुरपाम यांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या जिनानने वणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनिकेत सोनटक्के याच्यासह तीन विधिसंघर्ष बालकांवर बीएनएसच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२)(३), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने काही वेळातच हिंसक वळण घेतल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.