रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरफोड्या करणारे चोरटे भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत निर्ढावल्याने शहरवासी कमालीचे काळजीत आले होते. शहरात घरफोड्या आणि चोरीच्या घटना वाढू लागल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतांनाच वणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून चोरट्यांना हुडकून काढले. डीबी पथकाने चोरी व घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा शीघ्र छडा लावत पाच आरोपींच्या मुसक्या आवळून चोरट्यांच्या टोळीवर मोठा घाव घातला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवून केलेल्या धडाकेबाज कारवाईत डीबी पथकाने एक घरफोडी, एक घरफोडीचा प्रयत्न आणि बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत रोख रक्कम व दोन मोठ्या बॅटऱ्यांसह २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरात मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने डीबी पथक सतर्क मोडवर होते. घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाकडून शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. डीबी पथकाने संशयित गुन्हेगारांवर करडी नजर ठेवत गोपनीय माहितीचे जाळे सक्रिय केले. नियमित पेट्रोलिंग, संशयितांवर लक्ष आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुमित राजू मानकर (२२) आणि राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (३२, दोघेही रा. रंगनाथनगर, वणी) यांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी घरफोडी आणि घरफोडीच्या प्रयत्नाची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा केला.
तपासाची साखळी पुढे नेत डीबी पथकाने आणखी एका कारवाईत विजय देवानंद मेश्राम (३२, रा. नवीन लालगुडा) आणि दोन महिला आरोपींना ताब्यात घेत बॅटरी चोरीचाही गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत चोरीस गेलेली रोख रक्कम आणि दोन मोठ्या बॅटऱ्या असा २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सततची पेट्रोलिंग, गुप्त माहिती, तांत्रिक आणि सातत्यपूर्ण तपासाच्या बळावर अल्पावधीत तीन गुन्ह्यांचा उलगडा करून डीबी पथकाने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची चुणूक दाखवली आहे. या कारवाईमुळे शहरातील घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल व ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख एपीआय सैय्यद साजिद तसेच डीबी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

No comments: