राजू उंबरकर नेते झाले आणि कार्यकर्त्यांचा दाटून आला उर, हार घालण्यासाठी हायड्रा तर जेसीबींनी केला फुलांचा वर्षाव
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द गाजविलेले राजू उंबरकर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते झाले आहेत. राजकीय क्षेत्रातील त्यांचं अतुलनीय कार्य, प्रखर व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजू उंबरकर यांना मनसेचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यांच्या सर्वसमावेशक कार्याची पावती म्हणून त्यांची मनसेच्या नेते पदी वर्णी लागली. झुंजारू व धुरंदर नेते म्हणून राजू उंबरकर यांची संपूर्ण विदर्भात ओळख असतांनाच आता हा विदर्भाचा ढाण्या वाघ अधिकृत नेता झाल्याने वणीकरांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. राजकारणात प्रभावशाली कार्य, समाजकार्यात हिरीरीने सहभाग, संकटात देणारा आधार, कठीण प्रसंगातिल पाठीराखा तसेच शहरातील समस्या, शहरवासीयांचे प्रश्न, कास्तकारांवर होणारे अन्याय, बेरोजगार युवकांना देणारा न्याय, सखा, सोबती, जिवलग व हक्काचा माणूस म्हणून वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या गळ्यातील टाईत असलेले राजू उंबरकर आता मनसेचे नेते झाल्याने वणी उपविभागात आनंदाची लाट उसळली आहे.महिलांचा भाऊराया व युवकांचा राजूदादा आता वजनदार नेता झाल्याने त्यांची गर्वाने छाती फुलली आहे. कास्तकारांच्या हक्कासाठी लढणारा व गोरगरिबांना मदतीचा हात देणारा राजूभाऊ मनसेचा नेता झाल्याने वणी उपविभागाचे प्रश्न सुटतील हा आशावाद आता जागा झाला आहे. सर्वांगीण विकासाला चालना मिळावी हे धेय्य उराशी बाळगणाऱ्या राजू उंबरकर यांचं राजकीय प्राबल्य आणखीच वाढल्याने वणी उपविभागाचं नंदनवन होईल ही अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रगल्भ कार्य आणि कुशल नेतृत्व याची मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेत राजू उंबरकर यांच्यावर नेते पदाची जबाबदारी सोपविली आहे. नेते पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर राजू उंबरकर यांचं वणी येथे जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांचं वणी येथे आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वजनदार व्यक्तीचे स्वागत करण्याकरिता तयार करण्यात आलेला वजनदार हार हायड्राच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात घालण्यात आला. राजूदादा नेता झाल्याचा आनंद त्यांच्यावर जीव ओवाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गगनात मावेनासा झाला. त्यांनी राजू उंबरकर यांच्यावर दोन जेसीबींनी फुलांचा वर्षाव केला. असा हा अवीट गोडीचा क्षण काल वणीकरांना अनुभवायास मिळाला. शिवतीर्थ येथे काल हा आनंदाचा उत्सव रंगला. ढोलताशा व डीजेच्या निनादात राजू उंबरकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कालचा हा स्वागत समारंभ डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. नेहमी आठवणीत राहील असा हा प्रसंग होता.
राजू उंबरकर नेते झाले. आता प्रश्न निकाली लागतील ही सर्वसामान्यांची आशा आहे. कास्तकारांच्या शेतमालाला भाव मिळेल ही एक आस लागलेली आहे. योग्य भाव मिळेल या आशेने कास्तकारांनी शेतमाल घरातच साठवून ठेवला आहे. शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला, खत बी-बियाण्यांच्या किमती वाढल्या, मजुरांची मजुरी वाढली, आणि त्यातही निसर्गाची मनमानी वाढली, पण शेतमालाचे भाव मात्र वाढले नाही. हा अन्याय दूर करण्याकरिता हक्काने पुढाकार घेणे जरुरी झाले आहे. वणी उपविभागात बेरोजगारांच्या फौज फाटा तयार झाल्या आहेत. रोजगार निर्माण करण्याकरिता कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाही. इथला तरुण रोजगाराकरिता महानगरांमध्ये वणवण भटकतो आहे. मनरेगाच्याही कामांमध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्ती वाढली आहे. मनरेगाची कामे मजुरांकडून न करता यंत्राने केली जातात. बिलं मात्र न काम केलेल्या मजुरांच्या नावाने काढली जातात. वणी तालुक्यात असंख्य कोळसाखानी आहेत, पण एकही वीज निर्मिती प्रकल्प या ठिकाणी तयार झालेला नाही. तसा कोणत्याही नेत्याकडून वा लोकप्रतिनिधींकडून प्रयत्नही झालेला नाही. लगतच्या वरोरा तालुक्यात दोन वीज निर्मिती प्रकल्प आहे. तर घुग्गुस या लहानश्या गावात एक वीजनिर्मिती प्रकल्प आहे. वणी नॉर्थ क्षेत्रातील कोळसाखाणींमधून या वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविला जातो. इंदिरा सूतगिरणीचं अद्यापही भिजत घोंगडच आहे. खाजगी सूतगिरणी तयार झाली पण इंदिरा सूतगिरणीला पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न झाला नाही. सरकारमान्य कंपन्यांमध्ये जीआर नुसार पगार मिळतो तर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये तुटपुंज्या पगारावर कर्मचाऱ्यांना राबविले जाते. कोल वॉशरीज व हेवीवेट कंपन्यांमध्ये वशिलेबाजीला उधाण आले आहे. लोकप्रतिनिधी, संबंधित राजकारणी किंवा सरपंचांचं वशिलापत्र असल्याशिवाय कंपन्यांमध्ये रोजगाराच मिळत नसल्याने गरजू व होतकरू युवक रोजगारापासून वंचित रहात आहेत. अनुभवी लोकांना कामे मिळत नाही तर वशिल्यावर अकुशल उमेदवारही रोजगार प्राप्त करतो. हा दुजाभाव सध्या वणी उपविभागातील रोजगार क्षेत्रात पाहायला मिळत आहे. कोलडेपो व कोळसा सायडिंगच्या प्रदूषणाने नागरिक बेजार झाले आहेत. शहरातील मुख्यमार्ग हे कोळसाखाणींकडे जाणाऱ्या रस्त्यांसारखे झाले आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. कोळसा सायडींगवरूनही सतत कोळशाची धूळ उडत असते. शहरातील काही प्रमुख रस्ते व काही भागांमध्ये नेहमी काळं धुकं पसरलेलं पाहायला मिळतं. कोळशाच्या काळ्या धुळीमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणाने उचांकी पातळी गाठली असतांनाही कुणीही या विरुद्ध आवाज उठवायला तयार नाही. शहरातील काही भागांमध्ये अद्याप विकासाची गंगा पोहचली नाही. काही भागांना अजूनही भूमिगत गटार योजनेचा लाभ मिळालेला नाही. रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. काही भागांमध्ये वरच्यावर कामे होतात. तर काही भागांमध्ये विकासकामांचा वानवा आहे. ही विषम परिस्थिती दूर होणं गरजेचं आहे. नव्याने बांधकाम करण्यात आलेले रस्ते अल्पवधीतच उखडतात. कामाच्या गुणवत्तेकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. उडाणपुलाचा प्रस्ताव अजूनही धुळखातच पडला आहे. मालवाहू रेल्वेची वाहतूक वाढल्याने वेळोवेळी रेल्वे गेट बंद राहते. त्यामुळे तासंतास रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळतात. अशा अनेक समस्या व प्रश्न वणी शहर, तालुका व उपविभागात पहायला मिळतात. ते सोडविण्याकरिता खंबीर नेतृत्व व नेत्याची गरज या क्षेत्राला आहे. खनिज संपत्तीने निपुण असलेला हा तालुका रोजगार व विकासाच्या बाबतीत आजही मागासलेलाच राहिला आहे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळायला आणखी किती वर्ष लागतील काय माहित. जनतेला लॉलीपॉप दिलं की ते चोखत बसतात, अशी अवस्था झाली आहे. आश्वासनांचं गाजर दाखवा आणि सत्ता गाजावा हा आता फंडाच झाला आहे. जनता भोळी आहे, तिला भावनिक साद द्या. कुठे कमी पडलं तर मदतीचा हात द्या. थोडं द्यायचं नि स्तुती करून घ्यायचं, निवडणूक आली की, खूप काही सांगायचं, हे राजकारणाचं गणितच झालं आहे. जनकल्याणाच्या ध्यास असलेला नेता या परिसराला लाभणं गरजेचं आहे. ही संकल्पना आता तरी पूर्ण होईल काय, हा सर्वसामान्यांचा आवाज या निमित्तानं कानावर पडू लागला आहे.
Comments
Post a Comment