आठ वैद्यकीय अधिकारी असतांनाही वणी ग्रामीण रुग्णालयात होते रुग्णांची हेळसांड
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी ग्रामीण रुग्णालयात आठ वैद्यकीय अधिकारी असतांनाही ते ओपीडीच्या वेळेला उपस्थित रहात नसल्याने रुग्णांची चांगलीच हेळसांड होतांना दिसत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे येथे उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना तासंतास ताटकळत राहावं लागत असल्याने त्यांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात आठ वैद्यकीय अधिकारी सेवारत असतांना देखील रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव दिसून येतो, हे समजण्यापलीकडे आहे. केवळ एकच डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्याचे सोपस्कार पार पाडतांना दिसतो. त्यामुळे रुग्णांना तासंतास रांग लावून उभे राहावे लागत असल्याने त्यांना आजारपणात डॉक्टरांचा हलगर्जीपणा सहन करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना योग्य उपचार मिळावा म्हणून आठ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. परंतु ते नावालाच असल्याचे दिसून येत आहे. बाह्य रुग्ण विभागात केवळ एकच डॉक्टर रुग्णांची तपासणी करतांना दिसतो. एकच डॉक्टर सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी करीत असल्याने रुग्णांना तासंतास रांगेत ताटकळत राहावं लागतं. त्यामुळे रुग्णांची चांगलीच हेळसांड होतांना दिसत आहे. तपासणी करणारा डॉक्टर एक आणि रुग्ण असंख्य ही ग्रामीण रुग्णालयाची अवस्था झाली आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना योग्य उपचार मिळणे कठीण झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा फटका रुग्णसेवेला बसू लागला आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी केवळ वेतन लाटण्यापुरती ड्युटी बजावत असल्याची लेखी तक्रार येथील नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
वणी ग्रामीण रुग्णालय हे सोइ सुविधांचा अभाव, अत्याधुनिक उपचार प्रणाली, रेबीज व गंभीर आजारांवरील लसींचा तुटवडा व अंतर्गत समस्यांमुळे नेहमीच चर्चेत असतं. रुग्णांना रेफर करणारं रुग्णालय म्हणूनही वणी ग्रामीण रुग्णालयाची ओळख निर्माण झाली आहे. आता तर प्राथमिक तपासणी व उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही ग्रामीण रुग्णालयात हेळसांड होऊ लागली आहे. बाह्य रुग्ण विभागात केवळ एकच डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांना तासंतास रांग लावून उभं राहावं लागत आहे. आधीच आजारांनी फणफणत असलेल्या रुग्णांना रांगेत ताटकळत राहावं लागत असल्याने त्यांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसत आहे.
एकच डॉक्टर सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी करीत असल्याने तो ही काळजीपूर्वक आजार जाणून न घेता घाईघाने तपासणी करून वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयांच्या पायऱ्या चढाव्या लागत आहे. येथील बहुतांश डॉक्टरांनी आपले स्वतःचे रुग्णालय थाटले आहे. त्यामुळे ते ग्रामीण रुग्णालयात अतिशय कमी वेळ देतात. एवढेच नाही तर येथे येणाऱ्या रुग्णांना आजाराची भयावता दर्शवून खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास प्रवृत्त करतात. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार मिळावे, याकरिता आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही रुग्णांची हेळसांड होतांना दिसत आहे. केवळ एकच डॉक्टर रुग्णांची तपासणी करतांना दिसतो. मग सात वैद्यकीय अधिकारी कुठे असतात, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. ओपीडीच्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांची असलेली अनुपस्थिती रुग्णांच्या उपचारात बाधा आणू लागली आहे. आठ वैद्यकीय अधिकारी असतांनाही रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांमधून कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात प्रामाणिक कर्तव्य बजाविण्याला प्राधान्य देत नसल्याची लेखी तक्रार येथील नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे. तक्रार अर्जावर प्रशांत गाडगे, दीपक तिरमनवार सतीश प्रेमकुंदलावार, राकेश डुबे, राजू झाडे, रितेश रायपुरे, किशोर सोनटक्के यांच्यासह २२ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment