वर्धा नदीवरील नवीन पुलाला काही दिवसांतच गेले तडे, पूल वाहतुकीसाठी ठरू शकतो धोकादायक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलाला तडे जाऊ लागल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या पुलावरील रस्त्याला भेगा पडल्या असून काही दिवसांतच रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुलाच्या वरील भागाला तडे गेले असून रस्त्यावर खड्डे व भेगा पडल्या आहेत. जनु या पुलाने जागा सोडायला सुरुवात केली असल्याचे जाणवत आहे. पुलाला तडे गेल्याने वाहतुकीबाबत सावधानता बाळगली जात आहे. या पुलावरून सावधपणे वाहतूक सुरु आहे. या पुलाला मोठं मोठ्या भेगा पडल्याने हा पूल वाहतुकी करिता धोकादायक ठरू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
वणी वरोरा मार्गाचे चौपदरीकरण करतांना वर्धा नदीवर उंच पूल बांधण्यात आला. हा पूल साकारण्यात आल्यानंतर वाहतूक सुलभ होईल व रहदारीला गती मिळेल ही अपेक्षा बाळगली जात होती. वर्धा नदीला पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहण्याचा नेहमी धोका असायचा. पाटाळा पुलावरून पाणी वाहू लागले की, वाहतूक ठप्प पडायची. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला की, वाहतूकदारांमध्ये धाकधूक निर्माण व्हायची. परंतु वर्धा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलामुळे वाहतुकीला कुठलेही अडथळे निर्माण होणार नाही, ही सर्वांनाच अपेक्षा होती. पण पहिल्याच पावसाळ्याने या पुलाच्या बांधकामाचं पितळ उघडं पाडलं. या पुलावरील रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. या पुलाला जागोजागी तडे गेले आहेत. पुलाने जागा सोडायला सुरुवात केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकी करीता धोकादायक ठरू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावरच आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची धोकादायक झालेली अवस्था बघता आमचा जुना पुलंचं बारा होता, ही प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. वणी नागपूर मार्ग हा नेहमी वाहतुकीने गजबजलेला असतो. वणी हा खनिजाने नटलेला तालुका असल्याने येथून मोठ्या प्रमाणात खनिजाची वाहतूक सुरु असते. तालुक्यात वाहतूक कंपन्यांचं मोठं जाळं पसरलं आहे. वणी नागपूर हा खनिज व कोळसा वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. वणी वरून वरोरा, वर्धा, नागपूर, वडसा, उमरेड येथे मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरु असते. खनिजाची वाहतूक करणारी वाहने याच पुलावरून जाणे येणे करतात. अवजड वाहतुकीचा हा मार्ग असल्याने पुलाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होणे अपेक्षित होते. पण याही कामात टक्केवारीचं गणित जुळविल्याचे दिसून येत आहे. आधी आपला वाटा, नंतर पुलाचा रपाटा हे सूत्र येथेही अवलंबिल्याचे दिसते. टक्केवारीमुळे रस्ते व पुलाचे बांधकाम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होऊ लागले आहे. बांधकामाचे टेंडर घेतांना सर्वांचेच हित जोपासावे लागत असल्याने दर्जाहीन बांधकाम होऊ लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीवरील पुलाची देखील हीच अवस्था झाली आहे. रामसेतू या नावाने उभारण्यात आलेला पूल काही इंच दबल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वर्धा नदीवरील पुलालाही मोठं मोठ्या भेगा पडल्याने नवीन बांधकामाबाबत आता संशय निर्माण केला जात आहे. वर्धा नदी वरील हा पूल निर्माणाधीन असतांना मागील वर्षी पुराचे पाणी या पुलाला देखील टेकले होते. या पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तविली जात आहे. शासन व प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment