स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही राजूरवासियांना काढावा लागतो चिखलातूनच मार्ग



प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील रेल्वेच्या कोळसा सायडिंगवर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची पुरती वाट लागली असून खड्डे व चिखलामुळे नागरिकांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. कोल वाशऱ्यांमधून कोळसा सायडिंगवर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे राजूर रिंग रोडची अवस्था अतिशय बिकट झाली असून रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे राजूर रिंगरोडला पांदण रस्त्याचे स्वरूप आले आहे. हा मार्ग पूर्णतः चिखलमय झाल्याने रहिवाशी वस्त्यांमधील नागरिकांना मार्गक्रमण करतांना चांगलेच हाल सोसावे लागत आहे. छोट्या वाहनधारकांना तर या रस्त्याने वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात चिखल व पावसाळ्यानंतर प्रदूषण या दोन्ही समस्यांना येथील नागरिकांना नेहमीच तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही चिखलातूनच वाट शोधण्याचं दुर्दैव येथील नागरिकांच्या नशिबी आलं आहे. खनिज संपन्न तालुक्यात वास्तव्य करतांना विविध समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना खनिज विकास निधीतून कुठला विकास साधला जातो, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कोळसा सायडिंग व कोळशाच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या शासन, प्रशासनाकडे मांडूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने येथील जनता व्यथित झाली आहे. लोकप्रतिनिधीही पोकळ वल्गना करून व आश्वासने देऊन आपले अंग काढून घेत असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया आता नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. 

मिनी इंडिया म्हणून ओळखले जाणारे व इंग्रजी राजवटी पासून कोळसाखान असलेले राजूर हे गाव विकासापासून दूर लोटले जाऊ लागले आहे. कोळसा व्यवसायामुळे राजूर (कॉ.) येथे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. कोळसा सायडिंग व कोळशाच्या वाहतुकीमुळे राजूर येथे अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांना तोंड देणे नागरिकांसाठी नित्याचेच झाले आहे. कोल वाशऱ्यांमधून कोळसा सायडिंग वर सतत अवजड वाहतूक सुरु असते. तसेच कोळसाखाणींमधूनही कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे राजूर रिंगरोडची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कोळसा सायडिंगवर कोळशाच्या होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रिंगरोडला मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. या रस्त्याने चिखल तुडवीत जाणे येणे करावे लागत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. छोट्या वाहनधारकांना तर जीव मुठीत धरून या रस्त्याने वाहने चालवावी लागत आहे. विद्यार्थ्यांनाही शाळेत जातांना चिखलातून वाट शोधावी लागते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना राजूरवासियांच्या नशिबी मात्र मागासलेपणाच आला आहे. कोळसा सायडिंगमुळे येथील नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. येथील नागरिकांच्या व्यथा कुणीही कानावर घेतांना दिसत नाही. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही येथील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

कोल वाशऱ्यांमधून कोळसा सायडिंगवर होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे रस्ता चिखलमय झाल्याने बॅरल लाईन, जैन लाईन, वैद्य लाईम, स्वस्तिक लाईम, मस्जिद परिसर या भागांचा राजूर या गावापासून संपर्क तुटला असून या परिसरांकडे जातांना चिखल तुडवीत जावे लागत आहे. या भागांमध्ये १५ हजार लोकं वास्तव्याला आहेत. त्यांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरिता जाणेही कठीण झाले आहे. या रस्त्याने दुचाकीचा प्रवास तर बंदच झाला आहे. पण पायदळ जाणे येणे करतांनाही मोठे हाल होत आहे. याच भागात सर्व धर्मीय स्मशान भूमी व कब्रस्थान असून तिकडे जाण्याचाही हाच प्रमुख रस्ता आहे. पण या रस्त्यावर चिखल साचल्याने या रस्त्याने जाणे येणे करणे धोकादायक झाले आहे. कोळसा सायडिंग व कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ते रस्त्याअभावी कोंडीत सापडले आहेत. चिखलमय रस्त्यावरून जाणे येणे करणे कठीण झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळा बुडू लागल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन कोंडीत सापडलेल्या नागरिकांचा मार्ग सुरळीत करून देतील काय, ही संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.   


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी