वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला पाच गावांचा संपर्क, प्रशासन अलर्ट मोडवर, गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यात मागील काही दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. वर्धा व निर्गुडा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नदी काठावरील गावांना अलर्ट करण्यात आले आहे. वर्धा नदीने धोक्याची पातळी गाठली असून पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. वर्धा नदी उफान मारू लागल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे. पुराचा धोका लक्षात घेता नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने आसपासचा परिसर वेढला असून वर्धा नदी पासून काही अंतरावर असलेल्या रेस्टोरंटलाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. वणी शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून आज शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे सेलू, कवडशी, भुरकी, चिंचोली व सावंगी या गावांचा संपर्क तुटला आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्याने गावांना वेढा घातल्यास गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याकरिता बोटीचीही व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चार जवान वणीत दाखल झाले आहेत. प्रशासन पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले. पावसाळा सुरु होऊनही जलधारा न कोसळल्याने कास्तकार चिंतेत आला होता. पण जुलैच्या मध्यार्धात पाऊसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी मागील काही दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहे. यावर्षीही ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ येऊ नये, या गर्तेत तो अडकला आहे. तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. वर्धा व निर्गुडा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वर्धा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी आजूबाजूचा परिसर घेरू लागले आहे. वर्धा नदी पासून काही अंतरावर असलेल्या रेस्टोरंटला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. वर्धा नदीच्या जुन्या पुलापर्यंत पाण्याची पातळी वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वर्धा नदी फुगल्याने नदी काठावरील गावकऱ्यांना मागील वर्षी पुराने केलेल्या विध्वंसाच्या कटू आठवणी अंगावर शहारे आणू लागल्या आहेत. मागील वर्षी वर्धा नदीला तब्बल तीन वेळा पूर आला, व गावच्या गावं उध्वस्त झाली. वर्धा नदीने रौद्र रूप धारण केले, व रो रो करत पुराचे पाणी गावात शिरले. नदी काठावरील गावे अक्षरशः जलमय झाली. घरातील वस्तू, साहित्य व अन्नधान्याबरोबरच पशुधनही वाहून गेलं होतं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या विध्वंसाच्या आठवणी आजही थरकाप उडवितात. मागील वर्षी निसर्ग कोपला होता. यावर्षीही पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे मागील वर्षी वर्धा नदीला आलेल्या प्रलयकारी पुराच्या आठवणी न कळत पुराची झळ सोसलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर तरंगू लागल्या आहेत.वर्धा नदीने परत रूप बदलण्यास सुरुवात केली आहे. तिचं पात्रही विस्तारलं आहे. तिने आसपासचा परिसर आपल्या कवेत घेतला आहे. ती आणखी आपल्या भुजा खोलू लागली आहे. तिच्या प्रवाहाचा वेग पाहून काठावर वसलेल्या गावकऱ्यांच्या उरात धडकी भरू लागली आहे. तिचा विस्तार वाढल्याने नदीकाठावरील गावांचा संपर्क तुटू लागला आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांना गावातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चिंचोली, सावंगी, कवडशी, सेलू व भुरकी या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती बघता प्रशासनही सज्ज झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाचे चार जवान वणीत दाखल झाले आहेत. पुराचे पाणी गावात शिरल्यास गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्याकरिता बोटीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
Comments
Post a Comment