वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून वाहून गेलेल्या चार पैकी तिघांचे मृतदेह सापडले, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर घडल्या दुःखद घटना
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुका हद्दीतून वाहणाऱ्या वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून चार जन वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदी पात्रात आंघोळीकरिता गेलेल्या सहा जनांपैकी दोन जन पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले होते. तर तालुक्यातीलच जुनाड गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रात पोहण्याच्या नादात दोन युवक वाहून गेल्याने स्वातंत्र्य दिनाच्या आनंदी पर्वात दुःखाचे वातावरण पसरले. १५ ऑगस्टला दुपारच्या सुमारासच या दोन्ही घटना घडल्या. या दोन्ही घटनेतील तीन युवकांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले असून अन्य एकाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
वणी तालुक्यातील नायगाव (खु) येथे वास्तव्यास असलेले सहा युवक वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदी पात्रात आंघोळीकरिता गेले होते. त्यातील दोन युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते आणखीच खोलात गेले. पाण्याचा प्रवाह तेज असल्याने सोबत असलेल्या चार युवकांच्या डोळ्यासमोर ते क्षणात वाहून गेले. तर आंघोळीकरिता नदी पात्रात उतरलेले चार युवक हे सुखरूप बाहेर पडले. सोबत असलेले प्रवीण सोमलकर (३५) व दिलीप कोसूरकर (४०) हे दोन युवक नदीत वाहून गेल्याने विशाल तुरकर (३२), विजय उईके (३८), स्वप्नील सूरतेकर (२०) व जगदीश बावणे (३५) यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना देताच संपूर्ण गाव हादरलं. ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व गावकऱ्यांनी मिळून नदीच्या किनाऱ्यावर त्या दोघांचाही शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण ते कुठेच आढळून आले नाही. अखेर आज प्रविण सोमलकर (३५) या युवकाचा कोना शिवरालगत नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसला आहे. प्रवीण सोमलकर व दिलीप कोसूरकर हे नायगावचे जावई असून ते अनेक वर्षांपासून गावातच वास्तव्याला आहेत. प्रविण सोमलकर हा एका पेट्रोलपंपवर काम करीत होता. त्याच्या पश्चात एक मुलगी व पत्नी असा आप्त परिवार आहे. तर दिलीप कोसूरकर हा गवंडी काम करतो. तो पत्नी व मुलासोबत नायगाव येथेच राहतो. त्याचा शोध पथकाकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
दुसरी घटना ही शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनाड गावालगत घडली. वर्धा नदीच्या जुनाड पुलावर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पाच मित्र विरंगुळ्याकरिता आले होते. पुलाच्या कठड्यावर बसून हे पाचही मित्र गप्पा हाकत असतांना त्यातील दोघांना नदीत पोहण्याची हौस आली. रितेश नत्थू वानखेडे (१८) रा. शिवाजी नगर भद्रावती व आदर्श देवानंद नरवाडे (२०) रा. गजानन नगर भद्रावती हे पोहण्याकरिता नदी पात्रात उतरले असता पाण्याच्या तेज प्रवाहाने ते मित्रांच्या डोळ्यादेखत वाहून गेले. सोबतचे मित्र वाहून गेल्याने रोहन डोंगरे, अविनाश पचारे व मंथन चिंचोलकर यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे लोकं धावून आले, पण काही एक उपयोग झाला नाही. शेवटी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदी पात्रात शोध मोहीम राबविली. अखेर आज सकाळी त्या दोघांचेही मृतदेह आढळून आले. नदीत आंघोळ व पोहण्याच्या नादात तिघांना जलसमाधी मिळाली. तर एकाचा शोध सुरु आहे.
Comments
Post a Comment