कार्यालयात अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याकरिता मनसे नेते राजू उंबरकर यांनी पोलिस स्टेशनला दिली तक्रार
प्रशांत चंदनखेडे वणी
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी वर्गाची राहणारी अनुपस्थिती चिंतेचं कारण बनली आहे. अधिकारी वर्ग कामाच्या वेळेत कार्यालयांमध्ये दिसत नसल्याने त्यांचं नक्षल्यांनी अपहरण तर केलं नसावं, या काळजीपोटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी पोलिस स्टेशनला तक्रार देऊन या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. वणी तालुका हा नक्षलग्रस्त जिल्ह्यालगत असल्याने नक्षलवाद्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतुन केली आहे.
वणी येथील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची रहात असलेली अनुपस्थिती कार्यालयीन कामांकरिता येणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये बहुतांश अधिकारीवर्ग हा अनुपस्थित असतो. कार्यालयांमध्ये अधिकारीच रहात नसल्याने नागरिकांची महत्वाची कामे रखडली जातात. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कित्येकांची महत्वाची कामे व कागदपत्रे रेंगाळत पडली आहे. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षात केवळ टेबल आणि खुर्चीच निदर्शनास पडते, अधिकारी मात्र दृष्टीस पडत नाही. वणी तालुका हा प्रमुख मुख्यालय असतांना देखील अधिकारी वर्ग प्रामाणिक कर्तव्य बजवितांना दिसत नाही. अधिकारी वर्गाच्या बेजाबदारपणामुळे नागरिकांची कामे खोळंबली जात असल्याने त्यांची मोठी फरफट होतांना दिसते. बहुतांश अधिकारी हे पूर्णवेळ खुर्चीवर बसत नसल्याने महत्वाच्या कागदपत्रांकरिता नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अधिकारी वर्ग आपल्या कर्तव्य काळात कार्यालयात हजर रहात नसल्याने नागरिकांची कार्यालयीन कामे ही वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे कार्यालयात न दिसणाऱ्या अधिकाऱ्यांचे नक्षल्यांनी अपहरण तर केले नाही ना, ही शंका राजू उंबरकर यांना आल्याने त्यांनी या अधिकाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी वजा तक्रार पोलिस स्टेशनला केली आहे.
राजू उंबरकर यांनी स्वतः शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन निरीक्षण केले असता त्यांना कार्यालयीन वेळेत बहुतांश अधिकारी वर्ग हा अनुपस्थित दिसला. जबाबदार अधिकारी हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने राजू उंबरकर यांना चिंता वाटली. कार्यालयात अधिकारी वर्गच न दिसल्याने ते अस्वस्थ झाले. वणी तालुका हा नक्षलग्रस्त जिल्ह्यांना लागून असल्याने या अधिकाऱ्यांचे नक्षल्यांनी अपहरण तर केले नसावे, ही चिंता मनात आल्याने त्यांनी काळजीपोटी पोलिस स्टेशनला तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment