बाळ जन्माचा आनंद ठरला औटघटकेचा, अखेर काळजाच्या तुकड्याला काळाने हिरावलं
प्रशांत चंदनखेडे वणी
घरात नविन पाहुण्याचं आगमन होणार असल्याचा आनंद त्यांच्या सांसारिक जीवनात ओसंडून वाहत होता. घरात नवीन पाहुणा येणार असल्याच्या गोड बातमीमुळे त्यांच्या सांसारिक जीवनात आनंदाचं भरतं आलं होतं. त्यांच्या संसार वेलीवर फुल उमलणार होतं. घरात पाळणा हलणार असल्याने संसारात आनंदाचं वातावरण होतं. बाळ जन्माला येणार असल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इवलंसं बाळ कुशीत खेळणार असल्याच्या आनंदाने ते भारावून गेले होते. त्यांचं सांसारिक जीवन आनंदानं बहरलं होतं. बाळाच्या जन्माची त्यांना उत्सुकता लागली होती. बाळ जन्माचे डोहाळे लागल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहचला होता. बाळ जन्माला येणार असल्याच्या आतुरतेत मायेच्या कळा सोसल्यानंतर अखेर बाळंतपणाची घटका आली. महिला प्रसूत झाली, पण आनंदमग्न असलेला परिवार मात्र दुःखी झाला. जन्माला आलेल्या बाळाची अवस्था पाहून पती पत्नी धाय मोकलून रडू लागले. बाळाची शारीरिक अवस्था फार विचित्र होती. बाळ शारीरिक दृष्ट्या अविकसित व विकलांग जन्माला आल्याने त्यांच्या आनंदावर दुःखाचं विरजण आलं. त्यांनी बाळ जन्माची रंगविलेली स्वप्न क्षणात चूर झाली. त्यांचा आनंद औटघटकेचा ठरला. जन्माला आलेलं बाळ किती काळ जगेल ही काळजी जन्मदात्यांच्या काळजाचा ठोका चुकवीत होती. अखेर शर्थीच्या उपचारानंतरही काळजाचा तुकडा कायमचा हिरावला गेला. त्या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला, आणि घरात दरवळणारा आनंद उंबरठयावरच ओसरला. संसार वेलीवरच फुल उमलण्याआधीच कोमेजलं. नवीन पाहुणा घरी येणार असल्याने घरादारात संचारलेला आनंद अकल्पित प्रसंगाने दुःखात परिवर्तित झाला.
हा दुःखद प्रसंग ओढावला शहरातीलच एका परिवारावर. भगतसिंग नगर येथे राहणाऱ्या नरेंद्र शंकर बुजाडे यांचं नवजात बाळ ३० ऑगस्टला सकाळी दगावलं. त्यांची पत्नी भाग्यश्री यांची २९ जुलैला प्रसूती झाली. त्यांच्या पोटी अविकसित व विकलांग बाळ जन्माला आलं. विचित्र शारीरिक अवयव असलेलं बाळ जन्माला आल्यानंतर पती पत्नी अतिशय दुःखी झाले. बाळाची शारीरिक अवस्था पाहून व्यथित झालेल्या कुटुंबाने डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप केला. डॉ. लोढा यांनी सोनोग्राफी केल्यानंतर गर्भातील बाळ सुदृढ व निरोगी असल्याचे सांगितले होते. परंतु शारीरिक व्यंग असलेले बाळ जन्माला आले. त्यामुळे डॉ. लोढा यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेतून व पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केली होती. त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीतच बाळ दगावलं. त्यामुळे कुटुंबीय व नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयातच आक्रमक भूमिका घेत डॉक्टरच्या अटकेची मागणी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नवजात बाळाच्या शवविच्छेदनावरूनही वातावरण तापलं होतं. शेवटी ठाणेदार अजित जाधव, एपीआय दत्ता पेंडकर यांनी कुटुंबीयांची समजूत काढत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. ग्रामीण रुग्णालय व डॉ. लोढा यांच्या खाजगी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. ३० ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ. लोढा यांच्या रुग्णालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. काल ३१ ऑगस्टला शोक सभा घेण्यात आली. डॉक्टरांवर कार्यवाही होईस्तोवर न्यायासाठी लढणार असल्याची भूमिका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय क्षेत्र हे सेवाभावी क्षेत्र मानलं जातं. शरीर रोग मुक्त होण्याची आस घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे येतात. सर्वात जास्त विश्वास ठेवला जातो, तो डॉक्टरांवर. शारीरिक व्याधींपासून मुक्त होण्याचा विश्वास ठेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात. मृत्यूच्या दाढेतून कुणी परत आणू शकतो, तो म्हणजे डॉक्टर. रुग्ण सेवेची कास धरूनच वैद्यकीय क्षेत्र निवडलं जातं. पण वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लावणाऱ्या काही घटना समोर येऊ लागल्याने डॉक्टरांची प्रतिमा डागाळली जात आहे. मागील काही काळात काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या नैतिकतेवर तर काहींच्या चुकीच्या उपचार पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यांच्या पोलिस स्टेशनपर्यंत तक्रारीही झाल्या. काही डॉक्टरांवर सांसारिक जीवनातून आरोप झाले, तर काही डॉक्टरांवर हलगर्जीपणे रुग्ण हाताळल्याचे आरोप करण्यात आले. डॉक्टरांवर होणाऱ्या आरोपांमुळे वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघालं आहे. रुग्णांच्या विश्वासाची नाळ डॉक्टरांशी जुळली आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही, एवढा प्रामाणिकपणा तरी त्यांनी जपला पाहिजे, ही चर्चा आता शहरातून ऐकायला मिळत आहे.
Comments
Post a Comment