मटका अड्ड्यांवर पोलिसांनी उगारला कार्यवाहीचा बडगा, आणखी एका मटका अड्ड्यावर केली कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेले सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने पोलिसांनी अवैध धंद्यांवर टाच आणणे सुरु केले आहे. शहर व शहरालगत असलेल्या गावांमध्ये अवैध धंद्यांना उधाण आले असून हे खुले व लपून सुरु असलेले अवैध धंदे उधळून लावण्याकरिता पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. पोलिसांनी २५ ऑगस्टला शहरातील आणखी एका मटका अड्ड्यावर कार्यवाही करून १० हजारांच्या मुद्देमालासह एका सट्टेबाजाला अटक केली आहे. आदिल खान रफिक खान (२४) रा. नारायण निवास जवळ वणी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील अवैध धंद्यांबाबत माहिती गोळा करण्याकरिता पोलिस पथक शहारत गस्त घालत असतांना पो.हे.कॉ. विकास धडसे यांना सावरकर चौक परिसरातील नारायण निवास जवळ सार्वजनिक ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन वरळी मटका खेळविणाऱ्या आरोपीला अटक केली. सदर इसम हा चिट्ठीवर मटक्याचे आकडे लिहून देतांना पोलिसांना रंगेहात सापडून आला. मटका पट्टी फाडून पैशाची उतारी घेणाऱ्या आदिल शेख रफिक खान याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी मटक्याचे आकडे लिहून देण्याकरिता वापरले जाणारे साहित्य, दोन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मटक्याचा अवैध व्यवसाय हा पुर्विपार चालत आलेला आहे. अनेक जण मटक्याच्या आकड्यांवर पैसे लावून आपले नशीब आजमवितांना दिसतात. पण मटका खेळणारा धनवान झाल्याचे कधी पहायला मिळाले नाही. उलट मटका चालविणारे मात्र मालदार झाल्याचे सर्वत्र पहायला मिळते. मटका अड्डे चालविणाऱ्या आपल्या सगे संबंधितांना संरक्षण मिळावे म्ह्णून काही जण वाईट कॉलर झाले आहेत, तर काहींनी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या आहेत. पोलिसांवर दबाव राहावा म्हणून काही राजकारणाच्या माध्यमातून तर काही त्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून मटका अड्डे चालविणाऱ्या आपल्या सगे संबंधितांना क्षय देत आहेत. त्यामुळे "ये दादा आज मटका लाव रुपयाला शंभर मिळतो भाव, लागली लाईन तुही धाव, लवकर होशील बाजीराव" ही लालसा देऊन महिला, पुरुष, तरुण मंडळी व लहान मुलांनाही मटक्याची लत लावली जात आहे.
मात्र आता पोलिसांनी सर्रास व छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर कार्यवाहीचा धडाकाच सुरु केला आहे. मटका अड्डे चालविणाऱ्यांची आता मुरवत केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरात असो की, शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात, मटका अड्ड्यांवर धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत ठाणेदार अजित जाधव यांनी दिले आहे. मटका जुगारावर कार्यवाही करतांना त्याचा वदरहस्त कोण, याची मुळीच तमा बाळगली जाणार नसल्याचेही ठाणेदारांनी स्पष्ट केले आहे. मटका अड्डा चालविणाऱ्या इसमावर किंवा मटका पट्टी फाडतांना अटक करण्यात आरोपींवर तीन पेक्षा अधिक वेळा कार्यवाही झाल्यास त्यांच्यावर स्थानबद्धतेची कार्यवाही देखील केली जाणार असल्याचे ठाणेदारांनी स्पष्ट केलं आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून पो.हे.कॉ. विकास धडसे, पो.कॉ. शुभम सोनुले, सागर सिडाम, शंकर चौधरी, वसीम शेख व पोलिस पथकाने केली.
Comments
Post a Comment