वणी पोलिस स्टेशन हद्दीत वाढल्या गुन्हेगारी कारवाया, पोलिसांचे संबंध ठरत आहे कार्यवाहीत अडसर
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कारवाया वाढू लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती प्रचंड वाढली असून गुन्हेगारांना पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पोलिसांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे अपप्रवृत्तीच्या लोकांचं मनोबल वाढू लागलं आहे. पोलिसांचा वचकच राहिला नसल्याने अपप्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. वाढत्या अपराधीक घटनांमुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात संघटित गुन्हेगारीही वाढली आहे. समूहाने येऊन मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. शुल्लक कारणांवरून वादविवाद व मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात भाईगिरीला उधाण आले आहे. महिला व मुलींच्या विनयभंगाच्या घटनाही वाढल्या आहेत. टपोरी व अपप्रवृतीच्या युवकांकडून महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकारही वाढले आहेत. चोरी व घरफोडीच्या घटनांनी तर रान उठविले आहे. दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. नागरिकांच्या किंमती वस्तू आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. नागरिकांच्या किंमती वस्तूंवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. चोरटे हातसफाई दाखवू लागले असतांना पोलिस मात्र हतबलता दर्शवू लागले आहेत. दुचाकी लंपास करण्यातही हे चोरटे पटाईत झाले आहेत. घरफोड्या करून ऐवज लुटून नेण्याचा या चोरट्यांनी सपाटाच लावला आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये होत असलेली वाढ पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची पावती देऊ लागली आहे.
डीबी पथकात ताळमेळ राहिलेला नाही. पथक प्रमुख नेहमी कार्यक्षेत्राबाहेर असतात. कुणाचं कुणावर नियंत्रण राहिलेलं नाही. पोलिसांचे अनेकांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. संबंध जोपासले जात असल्याने धाक कमी झाला आहे. काही पोलिस अधिकारी बऱ्याच वर्षांपासून वणी पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या मांडून आहेत. त्यांचा वणी पोलिस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांची बदली झालेली नाही. आणि ज्या अधिकाऱ्यांना वणी पोलिस स्टेशनमध्ये रुजू होऊन एक ते दीड वर्षांचा काळही झाला नव्हता त्यांची मात्र बदली करण्यात आली. काही अधिकारी व कर्मचारी मागील तीन ते चार वर्षांपासून वणी पोलिस स्टेशनला कार्यरत आहे, त्यांचे अनेकांशी संबंध दृढ झाले आहेत. त्यामुळे ते कार्यवाही करण्यास धजावत नाही. उलट तडजोड करण्यावर ते जास्त भर देतात. त्यामुळे अपप्रवृत्तीचे लोक चांगलेच निर्ढावले आहेत. त्यांच्या पोलिसी संबंधांमुळे गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. जवळ धारदार शस्त्र बाळगणे, टोळक्याने येऊन मारहाण करणे, दादागिरीची भाषा करणे, धमकावणे, मुली व महिलांची छेड काढणे, त्यांचा विनयभंग करणे, धमकावून बळजबरी करणे, शुल्लक कारणांवरून वादविवाद व मारहाण करणे, एवढेच नाही तर हत्या करण्यापर्यंत गुंडप्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊन शहरातील सुरक्षितता धोक्यात आली आहे. काही पोलिसांचे आपसी संबंध वाढल्याने गुन्हेगारीवर निर्बंध लागणे कठीण झाले आहे. आधी एखाद्याने पोलिसात तक्रार करतो म्हटले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये धडकी भरायची. पण आता जा पोलिसात तक्रार कर असा दम दाखविला जातो. यावरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा दरारा किती राहिला याची प्रचिती येते. पोलिसांचा सलोखा वाढल्याने टपोरीही दम देऊ लागल्याचे नागरिक आता खुल्या आवाजात बोलू लागले आहेत.
Comments
Post a Comment