केशव नागरी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप करणे भोवले, अखेर प्रा. महादेव खाडे यांच्यावर गुन्हे दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवहाराचे बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा खोटा आरोप करून पतसंस्थेची बदनामी केल्या प्रकरणी अखेर चौकशीअंती केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक प्रा. महादेव गोविंदराव खाडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. केशव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्या प्रा. महादेव खाडे यांच्या विरुद्ध ५ जुलैला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. अखेर प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी प्रा. महादेव खाडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व सदस्य राहिलेले महादेव खाडे यांनी २ जुलैला पत्रकार परिषद घेऊन केशव नागरी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. महादेव खाडे यांनी केशव नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर दिकुंडवार यांच्यावरही पतसंस्थेच्या व्यवहारात घोळ करून रक्कमेत अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी केशव नागरी पतसंस्थेच्या ठेवी असलेले अन्य पतसंस्था व बँकेचे खोटे कागदपत्र तयार करून केशव नागरी पतसंस्था व नंदकिशोर दिकुंडवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या विरोधात केशव नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळानेही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांचे खंडन करीत त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून सादर केलेले कागदपत्रच डुप्लिकेट असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ५ जुलैला पतसंस्थेच्या वतीने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. त्यात महादेव खाडे यांनी पतसंस्थेची बदनामी करून पतसंस्था बंद पडण्याच्या इराद्याने पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केल्याचे नमूद करतांनाच त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा व सखोल चौकशी करून काल २१ ऑगस्टला महादेव खाडे यांच्यावर भादंवि च्या कलम ४६८, ४६९, ४७१, ५००, ५०१ नुसार गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे करीत आहे.
Comments
Post a Comment