परशुराम पोटे हे सलग तिसऱ्यांदा झाले तंटामुक्ती अध्यक्ष, उल्लेखनीय कार्य व मनमिळाऊ स्वभावामुळे ग्रामस्थांनी त्यांनाच दर्शविली पसंती
प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मानकी गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा परशुराम पोटे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. १८ ऑगस्टला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते त्यांना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
मानकी ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास पिपराडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत परशुराम पोटे यांची तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परशुराम पोटे हे २०१६ पासून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे स्थानिक वादविवाद व तंटा निवारणाचे कार्य उत्तम असल्याने त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर तिसऱ्यांदा ही संधी मिळाली. परशुराम पोटे यांनी तंटामुक्तीचे कार्य करण्याची इतरांनाही संधी मिळावी म्हणून आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. परंतु ग्रामस्थांनी त्यांनाच पसंती दर्शवून सलग तिसऱ्यांदा त्यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड केली. तसेच तंटामुक्ती समितीच्या सचिवपदी पोलिस पाटील मीनाक्षी मिलमिले यांची तर तंटामुक्ती समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, ग्रा.प. सदस्य नानाजी पारखी, उमेश सावरकर, विठ्ठल सरवर, शंकर वासेकर, गुरुदेव चिडे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला ग्रामसेविका कविता कातकडे, कृषी अधिकारी, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment