केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांच्याकडे मागणी करूनही कोळसा सायडिंग हटविण्याला मिळाला नाही योग्य प्रतिसाद
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील वातावरण प्रदूषित करणारे रेल्वेचे दोन्ही मालधक्के शहरापासून दूर हलविण्याची अनेक वर्षांपासून जीवतोड मागणी होत असतांना शासनकर्ते मात्र आश्वासन देण्यातच धन्यता मानत आहे. प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरलेले रेल्वेचे हे दोन्ही माल धक्के रहिवासी वस्त्यांपासून दूर हलविण्यास शासन व प्रशासन उदासीनता दर्शवित असल्याने येथील रहिवाशी कमालीचे संतापले आहेत. शासन व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या नागरिकांचं आयुष्यमान घटू लागलं आहे. कोळशाच्या धुळीमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीही या कोळसा सायडिंग येथून हटविण्याची मागणी रेटून धरली आहे. एवढेच नाही तर कोळसा सायडिंगमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याची व्यथा केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांच्याकडेही काही सामाजिक संघटनांनी निवेदनातून मांडली आहे. भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या संयुक्त मोर्चा संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यावरण व वने केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव हे आले असता आमदारांनी स्वतः त्यांचे प्रदूषणाच्या या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. शहरवासीयांच्या आरोग्यास व कोळसा वाहतुकीमुळे त्यांच्या जीवितास धोकादायक ठरणाऱ्या या दोन्ही कोळसा सायडिंग इतरत्र हलविण्याची मागणी देखील आमदारांनी मंत्री महोदयांकडे केली होती. परंतु या कोळसा सायडिंग येथून हटविण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय जाहीर न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अगदी रहिवाशी वस्तीला लागूनच रेल्वेचे हे दोन मालधक्के आहेत. या मालधक्यांवर अहोरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. वणी नागपूर या मुख्य महामार्गालगतच या कोळसा सायडिंग असल्याने कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे नेहमी याठिकाणी अपघाताची शक्यता बळावलेली असते. कोळसा सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुख्य मार्गावर नेहमी वर्दळ रहात असल्याने वरोरा टी-पॉईंट जवळ नेहमीच वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. कोळसाखाणींमधून ट्रकांच्या माध्यमातून सायडिंगवर कोळसा आणला जातो. मालवाहू रेल्वेच्या माध्यमातून तो नंतर विद्युत प्रकल्पांना पाठविला जातो. मालवाहू रेल्वेत कोळसा भरतांना व कोळसा सायडिंगवर कोळशाची वहातुक करतांना मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडून ती आसपासच्या परिसरात पसरते. या कोळशाच्या धुळीमुळे आसपासचा परिसर नेहमी काळवंडलेला दिसतो. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे वायू प्रदूषणातही प्रचंड वाढ झाली असून नागरिक विविध आजारांना बळी पडू लागले आहेत. धुळीचे कण शरीरावर चिकटून रहात असल्याने येथील रहिवाशांमध्ये त्वचा रोगाचे प्रमाणही वाढले आहे.
रहिवासी वस्त्यांना लागूनच वेकोलिची व खाजगी कोळसा सायडिंग असून या दोन्ही कोळसा सायडिंगवरून सतत कोळशाची धूळ उडत असते. कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांची घरे व घरातील वस्तू देखील काळवंडल्या जात असल्याने नागरिक कमालीचे वैतागले आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण प्रदूषित होऊन प्रदूषित वातावरणात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रदूषणामुळे हा परिसरच सोडणे पसंद करू लागले आहेत. कोळसा सायडिंग वरून कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त होऊन येथील नागरिकांनी सायडिंगवर कित्येकदा मोर्चे काढले. अनेकदा नागरिकांनी आक्रमक भूमिकाही घेतल्या. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे उंबरठे देखील झिजविले. पण या कोळसा सायडिंग इतरत्र स्थानांतरित करण्यात सर्वांनीच उदासीनता दर्शविल्याने येथील नागरिक हतबल झाले आहेत. परंतु आमदारांनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांच्याकडे शब्द टाकल्याने या कोळसा सायडिंग येथून हटतील ही आशा निर्माण झाली होती. पण अद्याप सायडिंग हटविण्याच्या कुठल्याही हालचाली सुरु न झाल्याने नागरिकांची ही आशाही धूसर होतांना दिसत आहे. येथे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना काळा श्राप ठरलेल्या या कोळसा सायडिंग हटविण्याकरिता लोकप्रतिनिधी आग्रही भूमिका घेतील काय, या प्रतिक्रिया आता नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
Comments
Post a Comment