कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी साधला चोरीचा डाव

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरालगत असलेल्या व लालगुडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या हिराणी ले-आऊट, पटवारी कॉलनी येथील एका राहत्या घरी चोरट्यांनी चोरीचा डाव साधत ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज २९ ऑगस्टला सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबातील सदस्य घरातच झोपलेले असतांना अज्ञात चोरट्याने चोरीचा डाव साधला. याबाबत प्रवीण मुर्लीधर ताजने (३५) यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहाटे २.३० ते ५.३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी घरात शिरून चोरी केल्याचे प्रवीण ताजने यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

प्रवीण ताजने हे आपल्या कुटुंबासह हिरानी ले-आऊट, पटवारी कॉलनी येथे राहतात. ते वेकोलिच्या निलजई कोळसाखाणीत कार्यरत आहेत. ते रात्री कुटुंबासह घरातच झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. ते पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉक करिता उठले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराच्या मुख्य हॉल लगत असलेल्या बेडरूमचा दरवाजा खुला दिसल्याने ते बेडरूममध्ये गेले. बेडरूम मधील दृश्य पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. बेडरूम मधील दोन्ही कपाटांची दारे उघडलेली होती. कपाटातील लॉकरमध्ये ठेऊन असलेले सोन्याचे दागिने व पैसे तेथे आढळून न आल्याने घरात चोरी झाल्याची त्यांना खात्री पटली. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने (सोन्याचे मनी, डोरले असलेली काळी पोत वजन १० ग्राम कि. ३० हजार रुपये, सोन्याच्या तारात विणलेली सोन्याचे मणी असलेली पोत वजन १२ ग्रा. कि. ३८ हजार, ५ ग्रामची सोन्याची अंगठी कि. १२ हजार रुपये, अर्धा ग्रामचे दोन सोन्याचे लॉकेट कि. १५०० रुपये), एटीएम, आधारकार्ड व रोख ४ हजार ५०० रुपये असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत प्रवीण ताजने यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८०, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. कुटुंबातील सदस्य घरातच झोपलेले असतांना धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलिस कसून शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी