ढाबा मालकाच्या मुलाने वेटरला केली लाकडी दांड्याने बेशुद्ध होईस्तोर मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील सिंधी कॉलनी येथील एका ढाब्यावर काम करणाऱ्या वेटरला ढाबा मालकाच्या मुलाने लाकडी दांडयाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ ऑगस्टला रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. मारहाणी नंतर बेशुद्ध झालेल्या वेटरने १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनला आलेल्या वेटरला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे रेफर केले आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील मोंटू का ढाबा या व्हेज नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मध्ये शुभम वसंत येडमे (२४) रा. वसंत जिनिंग जवळ हा वेटरचे काम करायचा. १४ ऑगस्टला रात्री ११.५० च्या सुमारास तो दुकानाबाहेर असलेल्या खुर्च्या व टेबल हॉटेलच्या आत ठेवत असतांना ढाबा मालकाच्या मुलाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुला खुर्च्या व टेबल आत आणायला कुणी सांगितले असा प्रश्न करीत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. हातावर व डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केल्याने वेटरला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीमुळे वेटर हा बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून ढाबा मालकाचा मुलगा अन्नू साधवानी याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. वेटर शुभम येडमे याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी अन्नू साधवानी (२५) रा. सिंधी कॉलनी याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जखमी अवस्थेतच पोलिस स्टेशनला आलेल्या वेटरला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. शुभम येडमे याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारण्यात आल्याने त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अनेक गरीब घराची मुलं हॉटेल, दुकाने, मॉल अशा खाजगी मालकी हक्क असलेल्या ठिकाणी कामे करतात. त्यांना खाजगी मालकीहक्काच्या ठिकाणी गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. एवढेच नाही त्यांना शिवीगाळ व मारहाणही केली जाते. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर, पोलिस शिपाई वसिम शेख करीत आहे.
Comments
Post a Comment