दुचाकी चोरीचा मुख्य सूत्रधार असलेल्या चोरट्याला डीबी पथकाने पुणे जिल्ह्यातून केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
मोटरसायकल चोरी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शोध पथकाने पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या गावातून अटक केली आहे. तो चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोटारसायकल चोरी प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला गजानन मधुकर जाधव रा. मोहर्ली याला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहर व तालुक्यात मोटरसायकल चोरीचे सत्रच सुरु असल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहे. मोटरसायकल चोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असतांनाच स्थानिक गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरीच्या घटनेचा छडा लावतांनाच मुख्य सूत्रधारालाच अटक केली आहे. शहरातील जैन ले-आऊट येथिल मनीष पुरुषोत्तम बोढे यांची २३ एप्रिलला सायं. ५.३० वाजता फेमस टेलर या दुकानासमोरून मोटरसायकल चोरीला गेली होती. त्यांनी २५ एप्रिलला मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शोध पथक करीत असतांना त्यांना कायर येथील हसन शेख शफी (३०) या ऑटो मेकॅनिककडे सदर वर्णनाची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हसन शेख शफी याच्याकडे जाऊन सदर मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्याने ती मोटरसायकल मोहर्ली येथील अर्जुन तांदूरकर याच्या कडून ९ हजार रुपयात खरेदी केल्याचे सांगितले. अर्जुन तांदूरकर याच्याकडे चौकशी केली असता त्यानेही ती मोटरसायकल गावातीलच गजानन मधुकर जाधव याच्या जवळून ४ हजार ५०० रुपयात विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस चांगलेच बुचकाळ्यात पडले. पोलिसांनी गजानन मधुकर जाधव याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो मनमाड, येवला, नाशिक, पुणे अशा वाऱ्या करीत होता. चार महिन्यांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर पोलिसांना गजानन मधुकर चव्हाण हा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शोध पथकाचे प्रमुख एपीआय माधव शिंदे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने त्याला लोणी काळभोर या गावातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीच्या अन्य घटनांचा उलगडा करण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख माधव शिंदे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, हरिन्द्र कुमार भारती, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.
Comments
Post a Comment