बेसा (लाठी) येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या साठ्यात आढळून आली तफावत, तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला अहवाल


प्रशांत चंदनखेडे वणी 

स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणारे धान्य वितरकच आपल्या घशात घालू लागले आहे. गोरगरिबांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून धान्य पुरविले जाते. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रेशनकार्ड धारकांना ते वितरित केले जाते. मात्र या धान्यावर आता वितरकच डल्ला मारू लागल्याने गोरगरिबांवर मोठा अन्याय होऊ लागला आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकून वितरक गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवू लागले आहेत. स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या एका वितरकाचा बेसा (लाठी) गावातील रहिवाशांनी पर्दाफाश केला आहे. रेशन दुकानातील धान्य लाभार्थ्यांना वितरित न करता त्याची परस्पर  विल्हेवाट लावणाऱ्या वितरकाचा गावकऱ्यांनी खरपुच समाचार घेतला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे स्वस्त धान्य वितरकाचा काळाबाजार चव्हाट्यावर आला आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे गावकऱ्यांनी तहसीलदारांच्याही निदर्शनास आणून दिले. गावकऱ्यांच्या तक्रारी नंतर तहसीलदारांनी स्वतः गावात येऊन स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा साठा तपासाला असता त्यात मोठी तफावत आढळून आली. तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानाचा पंचनामा करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 
तालुक्यातील बेसा (लाठी) या गावातील नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याची वेळोवेळी तक्रार केल्याने प्रशासनाने अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. तहसीलदारांनी बेसा येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासाला असता त्यात मोठी तफावत आढळून आली. गावातील बहुतांश लाभार्थ्यांना धान्यच वितरित झाले नसतांना धान्य गेले कुठे हा प्रश्न त्यांनी वितकाला विचारला असता तो निरुत्तर झाला. त्यातल्यात्यात धान्याने भरलेला ऑटो स्वस्त धान्य दुकानाजवळ येताच नागरिकांनी तो आडवून धरला. त्यात तांदळाचे व गव्हाचे पोते भरलेले होते. यावरून वितरक स्वस्त दुकानातील धान्याचा काळाबाजार करीत असल्याचे स्पष्ट झाले. गोरगरिबांच्या उपजिविकेकरिता शासनाकडून पुरविले जाणारे धान्य वितरक काळ्या बाजार विक्री करीत असल्याचा संशय बळावल्याने तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा साठा व लाभार्थ्यांना वितरित केलेल्या धान्याची तपासणी केली असता दुकानातील धान्याच्या साठ्यात मोठी तफावत आढळून आली. गावातील बहुतांश लाभार्थ्यांनी धान्य मिळालेच नसल्याच्या तक्रारी केल्याने तहसीलदारांनी गावातील नागरिकांच्या तक्रारी व धान्य साठ्यात असलेली तफावत याचा अहवाल तयार करून तो जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 
वणी शहर व तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानात असेच प्रकार सुरु आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांचे पुरवठा कार्यालयाशी थेट संबंध येत असल्याने त्यांच्या धान्य वितरण प्रणालीकडे नजर अंदाज केले जाते. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी आहेत. पण पुरवठा विभाग त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतांना दिसत नाही. वणी पुरवठा विभागात पूर्ण दिवस अधिकारी नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे निवारणच होतांना दिसत नाही. वणी पुरवठा विभागात खाजगी कर्मचाऱ्यांचा मोठा भरणा आहे. हे कर्मचारी कंत्राटी आहेत, अंशकालीन आहेत की कायमस्वरूपी हे देखील कळायला मार्ग नाही. पुरवठा विभागात खाजगी कर्मचाऱ्यांचाच बोलबाला दिसून येतो. स्वस्त धान्य दुकानदारांशी त्यांचाच थेट संबंध येतो. नागरिकांनाही आपली  रेशन कार्ड व अन्य महत्वाची कामे करून घेण्याकरिता त्यांचीच मनधरणी करावी लागते. पुरवठा निरीक्षण अधिकारी तर केवळ दोनच दिवस कार्यालयात हजेरी लावतात, त्यातही त्यांचा बराचसा वेळ वार्तालाप करण्यातच जातो. तक्रारकर्त्यांच्या तक्रारी गंभीरतेने ऐकल्याच जात नाही. काही स्वस्त धान्य वितरक धान्याचा साठा उपलब्ध होऊनही धान्याचे वितरण न करता धान्य आलेच नसल्याच्या थापा मारतात. धान्याची उचल करूनही लाभार्थ्यांना वेठीस आणून सोडतात. स्वस्त धान्य दुकानाच्या चकरा मारून थकलेल्या नागरिकांना नंतर वितरणाचा कालावधी संपल्याचे सांगण्यात येते. अनेक रेशन दुकानातून अतिशय निकृष्ठ दर्जाचं राशन मिळत असल्याच्या नागरिकांमधून तक्रारी ऐकायला मिळतात. काही स्वस्त धान्य दुकानदार तर लाभार्थ्यांना काहीही करणे सांगून त्यांना धान्य मिळण्यापासून वंचित ठेवतांना दिसत आहे. कित्येकांचे रेशन कार्ड बंद पडले आहेत. रेशन कार्ड सुरु करण्याकरिता त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेची लांबलचक यादी दिली जाते. त्यामुळे नंतर ते कार्यालयाकडे फिरकतच नाहीत. अनेकांचे रेशनकार्ड ऑनलाईन झाले नसल्याने त्यांना राशन मिळत नाही. लाभार्थ्यांच्या या समस्या व तक्रारी ऐकून घेण्याकरिता अधिकारी तत्पर व कार्यालयात पूर्णवेळ हजर राहणारा असणं गरजेचं आहे. वणी तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं राशन मिळतांना कधी कार्यालयीन अडथळे तर कधी वितरकाकडून अडथळे निर्माण केले जात आहे. त्यामुळे सवर्सामान्यांना राशन मिळण्यात येणारे अडथळे दूर करण्याकरिता पुरवठा विभागातील अधिकारी कार्यतत्पर असणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी